नेवली-हिल लाईन भागात जोडप्यांवर हल्ला केलेल्या घटनेची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
आरोपींना त्वरीत अटक करण्याचे निर्देश
मुंबई, दि. 4 : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील नेवली व हिल लाईन येथे फिरण्यासाठी गेलेल्या दोन जोडप्यांवर काही आरोपींनी हल्ला करून अत्याचार केलेल्या घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आरोपींना त्वरीत अटक करण्याचे निर्देश देखील डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस उपायुक्त श्री.मोहिते यांना दिले आहेत.
या घटनेतील चौघे रविवारी सुट्टी असल्याने सायंकाळच्या सुमारास मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. अचानक पाऊस आल्याने त्यांनी एका शेडचा आसरा घेतला. याठिकाणी उपस्थितीत असलेले समाजकंटक यांनी मुलींना छेडछाड करण्यास सुरुवात केली व त्या मुलींसोबत उपस्थित असलेल्या दोन तरुणांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या तावडीतून सुटून हे तरुण नेवली पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाणे येथून त्यांना मेडिकल करण्यासाठी पत्र देण्यात आले होते परंतु तेथे सदरील तरुण तेथे न जाता घरी गेले व त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल केली. यानंतर नेवली पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी त्यांना संपर्क करून गुन्हा नोंद करून घेतला असल्याची माहिती ठाणे पोलीस उपायुक्त श्री प्रशांत मोहिते यांनी डॉ.गोऱ्हे यांना दिली.
या घटनेत काही त्रुटी असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी मेडिकल रिपोर्टला पीडितांना पाठवत असताना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना का पाठवले नाही? असे विचारुन अशा घटनेत पीडितेसोबत मेडिकल करण्यासाठी पाठवित असताना पोलीस अधिकारी सोबत पाठविण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी श्री.मोहिते यांना केली.
या घटनेतील आरोपींना अद्यापपर्यंत अटक झाली नाही. त्यामुळे ज्या सुजाण नागरिकांना आरोपीबद्दल माहिती असेल त्यांनी ठाणे पोलीस उपायुक्त श्री.मोहिते यांच्याकडे द्यावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
दुर्गाडी किल्ला, मलंग गडच्या पायथ्याशी किंवा सदरील परिसरात नागरिक मोठ्याप्रमाणात फिरण्यासाठी जात असतात. त्यामुळे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी केली. तसेच यासाठी निधीची आवश्यकता असेल तर ते स्थानिक आमदार निधीतून देण्याची तयारी डॉ.गोऱ्हे यांनी दाखवली. तसेच या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण स्थानिक पोलीस ठाणे आणि कंट्रोल रूम मध्ये ठेवण्याची सूचना यावेळी त्यांनी दिली.