योगसाधनेच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन संभव – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
मुंबई प्रतिनिधी
दि. 3 : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटकाळात सर्वजण मोठ्या तणावातून स्वत:च्या अस्तित्वाशी लढत आहे. या लढाईचा सामना करण्यासाठी, भारतीय संस्कृतीमधील विविध योगसाधनेच्या माध्यमातून तणावमुक्त जीवन कसे जगता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि या माध्यमातून तणावमुक्त जीवन जगणे संभव आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे केले.
विधानमंडळात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी-कर्मचारी कल्याण केंद्र आणि श्री शिवकृपानंद स्वामी फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदगुरु श्री शिवकृपाशंकर स्वामी यांच्या उपस्थितीत समर्पण ध्यान योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, सन्माननीय विधीमंडळातील सदस्य, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विधानमंडळातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सभापती श्री.नाईक-निंबाळकर म्हणाले, कोरोनाच्या काळात प्रत्येकजण वेगळ्या तणावातून जात आहे. या तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी ध्यानयोगाच्या माध्यमातून किंवा योगसाधनेच्या माध्यमातून ज्यांना जे शक्य आहे ते अंवलब करुन जीवन आरोग्यदायी राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे सांगून त्यांनी कोरोना काळात आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु पावलेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
सदगुरु श्री शिवकृपाशंकर स्वामी म्हणाले, जनकल्याणाबरोबरच आत्मकल्याणाचा विचार करावा. स्वत:साठी काहीतरी करण्याची भावना मनात ठेवून रोज किमान 30 मिनिटे ध्यानयोग करावा. कोणत्याही कामाचे नियोजन करुन ते पूर्ण करावे आणि निस्वार्थ भावनेने कार्य करावे त्यामुळे स्वत:ला समाधान मिळते. योगध्यान मार्ग हा मनुष्य मनुष्याशी जोडण्यासाठी उत्तम मार्ग आहे. योगाच्या माध्यमातून भेदभाव कमी होतात. ध्यानयोग करताना अंतर्मुख व्हावे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, असेही श्री शिवकृपाशंकर स्वामी यांनी सांगितले.