ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मीतीवर भर – कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. 21 :

 शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्यातील रस्त्यांचे कॉक्रीटिकरणाचे काम होणे गरजेचे असून यासाठी ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मीतीवर विशेष लक्ष केंद्रीत करुन, या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

सटाणा ते मालेगाव रस्ता राज्य मार्ग क्रं.19 या रस्त्याच्या कॉक्रीटिकरणासाठी राज्यशासनाच्या अर्थसंकल्पात दोन तर क्रेंद्र शासनाच्या सि.आर.एफ. निधीतून एक अशी कामे मंजूर असून या रस्ते विकासाच्या कामांचा शुभारंभ आज राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, राहूल पाटील, मनेाहर बच्छाव, सखाराम घोडके, राजेश गंगावणे, संदीप पवार, प्रमोद निकम, निळकंठ निकम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी गावात पायाभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रस्तानिर्मीतीमध्ये काळी माती असल्यामुळे दर्जेदार रस्त्याचे काम होत नसल्याने कॉक्रीटिकरणातून रस्ता निर्मीतीचा संकल्प स्विकारण्यात आला आहे. कुसूंबा रस्ता राष्ट्रीय महामार्गात विभाजन करून ज्या पध्दतीने त्या रस्त्याचे कामकाज झाले आहे, त्याच प्रमाणे मालेगाव ते सटाणा रस्त्याचे कामकाज होवून भविष्यात चांगली सुविधा शेतकरी बांधवांना या माध्यमातून निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तालुक्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी तालुक्यात पाच रुग्णालये उभारण्यासाठी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच या रुग्णालयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात येईल. जिल्ह्यातील रस्ते विकासासोबतच पाणी पुरवठ्याच्या योजनेतही गाव स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी योग्य नियोजन व आराखडा तयार करुन शासनाच्या योजना गावा-गावात राबविण्यात याव्यात. त्यासाठी शासन सर्वोतोपरीने प्रयत्नशील आहे, असेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात वृक्षारोपण करुन मोठ्या प्रमाणात गावे हरित करण्याचा संकल्प करावा. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा आर्दश येणाऱ्या पिढीसमोर ठेवावा. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहन श्री.भुसे यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!