सुसंस्कृत समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : पालकमंत्री छगन भुजबळ

मालेगाव,

कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा चांगला वापर झाला. विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी शासनाने विशेष लक्ष दिले असून त्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. सुसंस्कृत समाज घडविण्यातही शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

हरिकेश लॉन्स, मालेगाव येथे जिल्हा परिषद शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमहापौर निलेश आहेर, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले, संभाजीराव थोरात, अंबादास वाजे, ॲड.रवींद्र पगार, संदीप पवार संस्थेचे अध्यक्ष संजय शेवाळे, मानद सचिव कैलास पगार, गट शिक्षण अधिकारी तानाजी भुगडे, विनोद शेलार यांच्यासह पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

लहान मुले ही देशाचे भविष्य असल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील जी लहान बालके झाडाखाली व उघड्यावर शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सर्वाधिक निधी खर्च करून अंगणवाड्या तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोना काळात शासनाने मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असून सध्याचा काळ अतिशय कठीण आहे. त्यातूनही शासन मार्ग काढत विकास कामांना प्राधान्य देत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

प्राथमिक शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध

दुःख, अडचणी आल्या तरी आपलं काम थांबता कामा नये त्यातून मार्ग काढत पुढे चाललं पाहिजे. याबाबत प्रेरणा म्हणून इतिहासाची पान एकदा वाचली पाहिजे असे मत व्यक्त करतांना मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, बहुतांश समाज हा शिक्षणापासून वंचित होता, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महापुरुषांनी संघर्ष केला असून त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करावे. ज्यावेळी समाज अधिक शिक्षित होईल त्यावेळी विविध प्रश्न आपोआप मार्गी लागतील. ज्ञान ही संपत्ती असून शिक्षक हे ज्ञान दाते आहेत हे लक्षात घेऊन कार्य करावे. आपल्या  अडचणी आहेत त्या सोडविल्या जातील. शासन शिक्षकांच्या सोबत असून आपले सर्व प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठीही निधीची तरतूद करण्यात येईल असे आश्वासनही मंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी दिले.

ग्रामीण भागातील शाळांच्या मुलभूत सुविधांवर भर द्यावा : नरहरी झिरवाळ

जिल्हा परिषद शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देतांना ग्रामीण भागातील शाळांच्या मुलभूत सुविधांवर संस्थेने लक्ष केंद्रीत करून भर देण्याचे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. कोरोना काळात निधन झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना संस्थेच्या तसेच संघटनेच्या वतीने मदत करून मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी  यावेळी केले. तर सर्व सदस्यांना अपघात विम्याचे कवच देणाऱ्या संस्थेला शुभेच्छा देत ही संस्था आज जिल्ह्यात तर उद्या राज्यात नावारुपाला येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संस्थेचे राज्य अध्यक्ष संभाजीराव थोरात, ॲड.रवींद्र पगार, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय शेवाळे यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!