श्रेयवादातून फ्लेक्स वॉर! मात्र दोन राजेंचा वाद सातारकरांच्या जिव्हारी
सातारा,
सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्राराजे भोसले यांच्यात कायमच धुसपुस होताना पहायला मिळत असते. त्यात कधी राजकीय वाद तर कधी टेंडरवरून वाद. तर कधी विकास कामांच श्रेय. या ना त्या कारणातून होणारे वादाचे पडसाद म्हणजे ग-ाऊंडलेवलला काम करणार्या बिचार्या कार्यकर्त्यांची डोकी फुटने, वार होणे, एकमेकांवर गुन्हे दाखल होणे. आणि अनेकवेळेला तर यांच्या वादातून संपुर्ण सातारची बाजारपेठच बंद पडते. असे असताना आता नगरपालिकेच्या निवडणुकीची हळूहळू डबडी वाजायला लागली की, या दोघांमध्ये पुन्हा वादाच्या ठिणग्या पडायला सुरवात झाली.
याला कारण ठरलं ते सातारा शहरातील पोवई नाका ते वाढे फाटा अशा जाणार्या रस्त्याची मंजूरी नेमकी कोणी करुन आणली यातून. उदयनराजेंनी या कामाची सुरुवात करण्याचा नारळ फोडला आणि वादाची ढिणगी पडली. कार्यक्रमस्थळी उद्घाटनाचा लावलेल्या फलका शेजारीच कार्यकर्त्यांनी आमदार शिवेंद्रराजेंच्या फोटोसह एका भल्या मोठ्या फलकाची उभारणी केली. यावर या रस्त्याला नितीन गडकरी यांनी सहीनिशी दिलेल्या मंजूरीचा कागद प्रकाशीत करून त्यावर मोठ्या अक्षरात लिहीले होते फकाम कोणाच, नाचतय कोण!ङ्ग या भल्या मोठ्या फलकाने सातारकरांना अचंबीत करुन टाकले.
उदयनराजेंनी केलेल्या उद्घाटनाची चर्चा संपुर्ण सातारभर झाली आणि रात्र होता होता आमदारांच्या फलकाने संपुर्ण सातार्यात चर्चा सुरु झाल्यानंतर रात्री उशीरा पुन्हा सोशल मीडियावर फिरणार्या उदयनराजेंच्या फोटोसह असलेल्या संदेशाची चर्चा सुरु झाली. यात लिहीले होते, फकाम आमचचं, म्हणूनच ठासून बोलतो. तुमच तर नेहमीचचं नाचता येईना म्हणे अंगणच वाकडे, अरे आता तरी सुधारा.ङ्ग अशा ठळक अक्षरासह मागणीसाठी दिलेले 24 जुलै 2020 चे पत्र, अधिक्षक अभियंता यांच्याकडून पुण्याच्या अभियंत्याकडे केलेली वर्ग कागदपत्र तारखेसह आणि केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत प्रस्तावित केलेल्या रस्त्याच्या कामाची यादी आणि मुख्य अभियंता पुणे यांचेकडून शासनास सादर केलेल्या 25 ऑॅगस्ट 2020 चे पत्र असा सातबारा देऊन हे काम उदयनराजे यांनीच मंजूर करुन आणल्याचे पुरावेच सोशल मीडियावर सादर केले. या सगळ्या वादात सातारा नगरपालिका आणि पोलिस यंत्रणा मात्र लगेचच सावध झाली. अवघ्या काही वेळातच दोन्ही फलक नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी डंपर लावून जप्त केले.
निवडणुका जवळ आल्या की या दोन राजेंमध्ये कायमच धुसफुस सुरु होते. हे दोन्ही राजे जेव्हा राष्ट्रवादीत होते तेव्हा या दोघांमध्ये समेट घडवण्याचा अनेकवेळा प्रयत्न हा शरद पवारांनी केला होता. तर स्थानिक पातळीवर वाद मिटवत असताना या दोघांचेही चुलते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्याकडून प्रयत्न झाला. मात्र, हा तात्पुरता मिटलेला वाद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की पेटायला सुरुवात होते. आणि त्यांच्या या वादातून अनेकदा कार्यकर्त्यांना बारा बारा महिने जेलची हवा खावी लागली. काही दिवसांपुर्वी सातार्यात कार्यकर्त्यांच्या बैठकांसाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आम्ही वाद मिटवण्यात सक्षम आहोत असे पत्रकारांना ठासून सांगितले. मात्र, याला एक महिनाही ओलांडला नाही की वाद सुरू झाला.
शांत संय्यमी म्हणून ओळख असलेल्या या सातार्यात अशांतता पसरते हे या दोन्ही राजेंना अनेकवेळा कळून चुकले आहे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो असं अनेक दिग्गज राजकिय नेते स्टेजवरच्या भांडणात सांगून जातात. यात सध्या राज्यात झालेली महाविकास आघाडी हे एक मोठे उदाहरण या दोन्ही राजेंच्या समोर आहेच. त्यामुळे या दोन्ही राजेंनी आपल्या वादाबाबत विचार करायला पाहिजेत अस सातारकरांना वाटल्यास वावगे नाही.