किरीट सोमय्यांवरील कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची, शिवसेनेचं स्पष्टीकरण
मुंबई
महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावला आहे. काल मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप सोमय्यांनी केला. आज पत्रकार परिषेदत बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. यावेळी त्यांनी ठाकरे यांना सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असं म्हटलं.
मात्र ही सोमय्या यांच्यावरील ही कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे, असं स्पष्टीकरण शिवसेनेनं दिलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, सोमय्या यांनी आमच्या मंगळावर,चंद्रावर जाऊन पाहणी करावी. लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे. केंद्राच्या सूचनेनुसार आरोप करायचे तर करु द्या. आरोप करणं हे फॅशन झाली आहे. कळेल त्यांना आमचा रंग कोणता आहे. मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं त्याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊतांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यावर आरोप करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाही. कोणी खोटे नाटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत. तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या इशार्यावर त्यांच्या यंत्रणांमार्फत प्रेशर करत असतील तर ते योग्य नाही, असं ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, याला नाट्य म्हणणं चुकीचं आहे. तो रंगभूमीचा अपमान ठरेल. महाराष्ट्रात मराठी नाटकाला परंपरा आहे. केंद्राच्या पाठबळावर महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. कालची कारवाई गृहमंत्रालयाची आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावल्यानंतर आता सोमय्या यांच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले आहेत. आज कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
सोमय्या यांनी म्हटलं की, मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी 27 तारखेला उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. तर 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. त्यावेळीही मला रोखणार आहे का?, असा सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे.
गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले.
नेमका काय केला आहे आरोप
सोमय्या म्हणाले की, 2020 साली कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिलिंग न होता, हा कारखाना बि-क्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या बि-क इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत 7185 शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, 998 मतीन हसीनचे, तर 998 गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे 98 टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे आहेत. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी 2019-20 मध्ये ग-ामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ-ष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.
घोटाळे उघडकीस आणणार्याला अटक करणारं सरकार
हसन मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकार हे घोटाळे उघडकीस आणणार्याला अटक करणारं सरकार आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं. मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑॅर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं, असंही ते म्हणाले. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली. मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले, असंही सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी, असं ते म्हणाले. सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असंही ते म्हणाले. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही ते म्हणाले.