शिवाजी पूल परिसराची उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

कोल्हापूर, दि. 27 – : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शाहुपुरीतील छत्रपती शिवाजी पूल परिसराची पाहणी करुन या भागातील पूर परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर उपस्थित होते.

यावेळी बाधितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री म्हणाले, नुकसान भरपाई बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन संबंधितांना लवकरात लवकर मदत दिली जाईल. येथील नागरिकांनी त्यांच्या पुनर्वसनाबाबत इच्छा असेल तर त्यांनी तसे प्रशासनाला कळवावे. कोल्हापूर शहराच्या स्वच्छतेबाबत राज्यातील कोणकोणत्या महानगरपालिकांनी मदत केली आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी मनपा आयुक्त श्रीमती बलकवडे यांना विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, मुंबई मनपाने शहराच्या साफसफाईकरिता 3 सक्शन वाहने दिली असून, शहरात पाणी साचू नये याकरिता काही सुधारणा कराव्या लागतील त्यासाठी अतिरिक्त निधी लागेल, असे त्या म्हणाल्या.

आमदार चंद्रकांत जाधव यांनी परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत अहवाल तयार करण्यात येईल असे उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. छ. शिवाजी पूलाची पाहणी करताना हा रस्ता चौपदरी महामार्गासाठी मंजूर झाला असल्याची कल्पना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. याप्रसंगी मनपाचे इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!