कोल्हापूर जिल्ह्यातील विस्थापितांचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला आढावा

कोल्हापूर, दि. 23 : जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा व शहरामध्ये स्थलांतरीत झालेल्या नागरिकांचा, कोल्हापूर डिझाइस्टर मॅनेजमेंटच्या (KDMG) सदस्यांसमवेत जिल्हा परिषदेमध्ये आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उप‍जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, शहरात व जिल्ह्यात झालेल्या विस्थापितांसाठी अन्नाची सोय करण्यात यावी. तसेच गॅस सिलेंडर, पुरेसा औषधोपचार यांचा साठा ठेवण्यात यावा. याकामी KDMG च्या सदस्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल. कोल्हापूर डिझाइस्टर मॅनेजमेंटने महासैनिकचा हॉल याकामी कार्यालय म्हणून वापरावा, अशी सूचना करुन पूरानंतर साफसफाईच्या कामाकडे अधिक  लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर डिझाइस्टर मॅनेजमेंटला पूरस्थितीत काम करण्यासाठी स्वयंसेवक, आवश्यक ती मशनरी आणि मदतीच्या अनुषंगाने इतर साहित्य देण्यात यावे. अशी मागणी इंद्रजित नागेश्वर यांनी केली. या बैठकीसाठी ललित संघवी, राजू लिंगरज, डॉ. शितल पाटील, शांताराम सुर्वे, विद्यानंद बेडेकर, रवी पाटील, अजय देसाई, दिप संघवी, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!