कोल्हापूर : 15 दिवसांत सैन्य भरतीचा मार्ग मोकळा करा, अन्यथा तीव्रआंदोलन – सदाभाऊ खोत

कोल्हापूर

राजकीय कार्यक्रम कोरोनाचे नियम पायदळी तुडवत सुरू आहेत. मात्र, सैन्य भरतीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे स्वत:च्या जीवाची परवा न करता सैन्य भरतीची स्वप्न पाहणार्‍या तरुणांच्या जीवाशी सरकारने खेळू नये. राज्य सरकारने लवकर सैन्य भरतीचा मार्ग मोकळा करावा. 15 दिवसांत याचा निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यभर उद्रेक होईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. आज सैन्यभरती सुरू करावी, या मागणीसाठी हजारो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेली सैन्यभरती तत्काळ सुरू करावी. तसेच पोलीस भरतीला परवानगी द्यावी. या मागणीसाठी आज रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सैन्य भरतीचा सराव करणार्‍या आणि पोलीस भरतीचा सराव करणार्‍या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. दसरा चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात तरुणाने जोरदार घोषणाबाजी करत भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या पार्श्वभूमीवर भरती रखडल्याने मुलांचे वयही वाया जात आहे. तसेच सरावासाठी लागणारा वेळ, पैसा याचादेखील विचार राज्य सरकार करत नाही. सैन्य भरती होण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे संमती पत्र द्यावे. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये रखडलेली सैन्यभरती आणि पोलीस भरतीत मुलांचे वय वाढवून द्यावे, अशी मागणी तरुणांनी केली आहे. दरम्यान, येत्या पंधरा दिवसात राज्य सरकारने यावर तोडगा काढून भरती घ्यावी. अन्यथा राज्यातील सर्व जिल्ह्यात उद्रेक पाहायला मिळेल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धार्मिक स्थळे बंद आहेत. गर्दीची ठिकाणे बंद आहेत. मात्र, राजकीय कार्यक्रमाला तुफान गर्दी होत आहे. मग राज्यसरकार सैन्य भरतीची तयारी करणार्‍या तरुणांच्या जिवाशी का खेळत आहे? त्यांनादेखील भरतीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. जर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून तसेच लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या तरुणांना भरतीसाठी पात्र करावे. त्यांना भरती प्रक्रियेत सामावून घ्यावे, अन्यथा तीव- आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!