कुशल मनुष्यबळास आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी -डॉ अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक
जालना प्रतिनिधी
15 जुलै
सध्याच्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून सिध्द झाले असून कोरोना साथरोगाच्या जास्त प्रादुर्भावा दरम्यान प्रशिक्षित व कौशल्यधारक मनुष्यबळाचा राज्य व देशात मोठा तुटवडा जाणवला. यापुढे कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना नुकतीच सुरू केली आहे. आरोग्य क्षेत्रात सेवा करण्याची मोठी संधी असून कौशल्यधारक मनुष्यबळास आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रामधील विविध कौशल्याचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन डॉ अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाचे कार्यकमात केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 जुलै 2021 रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अतिथी म्हणून डॉ अर्चना भोसले, डॉ. आणेराव, डॉ. आशिष राठोड, डॉ. नितीन पवार, डॉ. संतोष जायभाये, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहायक जिल्हा समन्वयक श्रीमती जया नेमाणे उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमुख अतिथींच्या हस्ते अप्रॉन, एन-95 मास्क आणि सँनिटायझरचे वेलकम कीट वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ अर्चना भोसले मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे युवकर्युवतींना मोफत अल्पकालावधीचे 10 विविध अभ्यासक्रमांचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध केले आहे. हे प्रशिक्षण घेवून रोजगारक्षम होण्यासाठी गरजूंनी पुढे येण्याची गरज आहे. तसेच, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने दि. 15 जुलै ते 30 जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात डॉ. आशिष राठोड, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. पुढे बोलतांना ते म्हणाले, फ्लेबॉटोमीस्ट या अभ्यासक्रमाचे फक्त ज्ञान असुन चालणार नाही, तर रक्त नमुना घेण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. होम हेल्थ एड, जेरियाट्रिक केअर एड या दोन कोर्सेची भविष्यात काळाची गरज आहे. होम हेल्थ एड मध्ये आपण घरोघरी जाऊन त्यांची ट्रिटमेंट करु शकतो आणि जेरियाट्रिक केअर एड या कोर्सद्वारे पेशंट वयोवृध्द जे की हॉस्पीटल मध्ये येवून ट्रिटमेंट घेवू शकत नाही, आपण त्यांना घरी जाऊन ट्रिटमेंट देऊ शकतो. इमर्जन्सी मेडिकल टेक्नीशियन, जी.डी.ए.अन्डव्हॉन्सड, मेडिकल इक्विपमेंट टेक्नॉलॉजी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, हॉस्पीटल फ्रॉट डेस्क कोऑरडीनेटर, सॅनिटरी हेल्थ एड, अॅब्युलन्स ड्रायव्हर या कोर्स विषयी भविष्यातील कौशल्य व रोजगाराच्या संधी असल्याचे त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त, कौशल्य विकास विभागाचे संपत चाटे यांनी केले. आभार प्रदर्शन मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुशील उचले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे चंद्रकांत मुंढे, मंगेश देशमुख, महेश उढाण आणि कौशल्य विकास कार्यालयाचे सुशील उचले, सुरेश बहुरे, अमोल बोरकर, रामदास फुले, सुभाष कदम, कैलास काळे, प्रदिप डोळे, उमेश कोल्हे यांनी परिश्रम घेतले.