शाळांनी स्वयंशिस्त पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी – आरोग्य मंत्री राजेश टोपे

जालना,

राज्यात आजपासून शाळा सुरू झाल्या. दीड वर्षांपासून ऑॅनलाइन शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आज शाळेत धडे घेतले. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी विद्यार्थी शाळेत जात असल्याचे समाधान मानले. त्याचबरोबर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी लहान मुलांची काळजी घेण्याची गरज व्यक्त करत शाळा व्यवस्थापनाने स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन त्यांनी केले.

सर्व परवानग्या घेऊनच राज्यातील शाळा उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शाळा सॅनिटाईझ करूनच विद्यार्थ्यांना शाळेत बसवले जात आहे. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांचे दोन्हीही डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थी हा समाजातील नाजूक घटक आहे, त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने स्वयंशिस्त पाळावी. शाळा नियमांचे पालन करतात की नाही, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, असेही टोपे यांनी म्हटले.

एखाद्या शाळेत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यास शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाच्या अधिकार्‍यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी कली पाहिजे. या पथकाजवळ स्वत:चे डॉक्टर्स असतात. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांबाबत काही शंका असल्यास पुढच्या उपाययोजना कराव्यात, अशा स्वतंत्र सूचना या पथकाला आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकार शाळांकडे लक्ष ठेवणारच आहे, मात्र शाळांनी देखील स्वनियंत्रण ठेवावे असे आवाहन देखील टोपे यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!