मिशन कवचकुंडल अभियानास जिल्ह्यात अधिक प्रमाणात गती द्या आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढवा – पालकमंत्री राजेश टोपे
जालना,
कोरोनाचे संक्रमण वाढू नये तसेच जिल्ह्यात अधिकाधिक लसीकरण व्हावे,यासाठी सुरू करण्यात आलेले मिशन कवचकुंडल या अभियानास जिल्ह्यात अधिक प्रमाणात गती देण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकार्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस, उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, अन्न औषध व प्रशासन विभागाच्या श्रीमती महाजन, डॉ. जयश्री भुसारे, डॉ. संजय जगताप, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. नार्वेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले, जिल्ह्यात दरदिवशी 25 हजार याप्रमाणे 4 दिवसांमध्ये 1 लक्ष नागरिकांचे मिशन कवचकुंडल या अभियानांतर्गत लसीकरण करण्यात येऊन लसीकरणाचा उच्चांक गाठला असल्याचे सांगत हे लसीकरण याच गतीने राबविण्यासाठी आशा वर्कर, तरुण यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येकाच्या घरी जाऊन नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देत लस घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थित अधिकार्यांना यावेळी दिले.
कोरोनामुळे बाधित होणार्या रुग्णांची संख्या कमी असली तरी यंत्रणेने गाफील न राहता जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होणार नाही यादृष्टीने नियोजन करत चाचण्याची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्याबरोबरच लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात याव्यात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग असून या उद्योगात काम करणार्या कामगारांचे लसीकरण करण्याबरोबरच कोरोनाची लक्षणे असलेल्या कामगारांची आर टी पी सी आर चाचण्या करण्यात याव्यात.
जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा आजघडीला जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढु नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा मुख्यालयाबरोबरच तालुका स्तरावर आरोग्य सक्षमीकरण कारणावर भर देण्यात येत असून अंबड व घनसावंगी येथील 100 खाटांच्या रूग्णालयाच्या उभारणीचा अहवाल सादर करावा. ग्रामीण रुग्णालय, घनसावंगी येथे पी. एस. ए. प्लँट कार्यान्वित करण्याबाबत गतीने कार्यवाही करावी. तसेच सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिकल परीक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.
संपुर्ण मराठवाड्यासाठीचे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय जालना येथे उभारण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून या रुग्णालयाची उभारणी होईपयर्ंत तात्पुरत्या स्वरुपात या रुग्णालयासाठी जागा निश्चित करून सेवा सुरू करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.