सर्व विभागांनी समन्वयाने काम करत अटल भूजल योजना यशस्वीपणे राबवावी – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना,

अटल भूजल योजना राबविण्यासाठी जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांची निवड झाली असुन सर्व विभागांनी समन्वयाने काम करत ही योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

अटल भूजल योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.आर. शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी ओंकारेश्वर बोडखे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव राठोड, जिल्हा वरिष्ठ भू वैज्ञानिक किरण कांबळे, सहाय्यक भू वैज्ञानिक डॉ. सी.डी. चव्हाण, ए.पी. नरवाडे, श्री सिरसाट, कविराज कुच्चे आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, पाणी बचतीच्या उपाययोजना व जलसंधारण व भूजल पुनर्भरण व्यवस्थापनाच्या सुत्राचा अवलंब करुन भूजल साठ्यात शाश्वतता आणण्यासाठी राबविण्यात येणारी ही योजना असुन यंत्रणेमधील विविध विभागांच्या सहकार्यातुन ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधुन ही योजना यशस्वीरित्या राबविण्याबरोबरच भुजल विभागाला आवश्यक असणारी माहिती येत्या आठ दिवसांमध्ये पुरविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

राज्यातील 13 जिल्ह्यात राबविली जाणार योजना

केंद्र शासन व जागतिक बँकेच्या निर्देशानुसार राज्यातील अतिशोषित, शोषित व अंशत: शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले असुन केंद्राच्या भूजल अहवालानुसार राज्यातील 13 जिल्ह्यातील 38 तालुक्यामधील 73 पाणलोट क्षेत्रातील 1 हजार 339 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 443 गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील 50 गावांचा योजनेत समावेश

अटल भूजल योजना राबविण्यासाठी जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला असुन यामध्ये जालना, परतुर व घनसावंगी या तालुक्यांचा समावेश आहे. यात जालना तालुक्यातील 8 गावे, घनसावंगी 20 गावे तर परतुर तालुक्यातील 22 गावे समाविष्ट आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!