जळगाव जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये! जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश
जळगाव, दि. 23 – :
मान्सून कालावधी सुरू असून राज्यात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, महापूर, दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिवीत व वित्तहानी होत आहेत.
जिल्ह्यातही तापी नदीवरील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही रजा मंजूर करू नयेत. क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी व कर्मचारी आपापल्या मुख्यालयी थांबतील. कार्यालयस्तरावरील नियंत्रण कक्ष कार्यरत राहतील, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. तसेच अनुपालन अहवाल व पावसाच्या सद्य:स्थितीबाबत वेळोवेळी अवगत करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.