भडगाव शहर पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळवून देणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

जळगाव दि.10 –

भडगाव शहरासाठी गिरणा नदीवरून पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळवून देण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

भडगाव नगरपरिषदेमार्फत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज मंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सर्वश्री. किशोर आप्पा पाटील, चिमणराव पाटील, उदय राजपूत, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष संजय सावंत, नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, मुख्याधिकारी विकास नवाळे
आदि उपस्थित होते.

मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, भडगाव नगरपरिषद ही नवनिर्मित नगरपरिषद असूनही या ठिकाणी चांगल्याप्रकारे विविध विकास कामे सुरू आहेत ही कौतुकाची बाब आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर शहरातील नदीवर आवश्यक असणारा पूल बांधण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात येईल. तसेच शहरात नगरपालिकेचे व्यापारी संकुल उभारण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल. गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनाचे संकट आहेत. अशाही परिस्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामार्फत विविध विकासाची कामे सुरूच आहेत हे आपल्याला भडगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय संकुल व प्रशस्त लायब्ररी वरून लक्षात येईल. भडगाव शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी गिरणा नदीवरून पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाण्यासाठी जलसंपदा मंत्री यांची भेट घेण्यात येऊन मंजूरी मिळविण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी मंत्री शिंदे यांच्या हस्ते कोविड काळात भडगाव नगरपरिषदेच्या दोन सफाई कामगारांचे निधन झाल्याने त्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी मंत्री शिंदे यांच्या हस्ते भडगाव नगरपरिषदेने नविन बांधलेल्या कै. शैठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेचा लोकार्पण, नविन बांधलेल्या घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण, नवीन वातानुकुलीत सभागृहाचे लोकार्पण तर नविन नगरपरिषद विशेष अर्थसहाय्य योजनेतंर्गत सात लाख लीटर नविन जलकुंभाचे बांधकामाचा, तसेच नगरपालिका हद्दीतील मौजे टोणगाव गट नंबर 454 मधील खुल्या जागेत बगीचा व खुल्या व्यायामशाळा विकसित करणे, नागरी दलितेत्तर योजनेतंर्गत एकविरा नगर अतंर्गत गटारी बांधकाम करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती जिल्हा नगरोत्थान अभियान योजनेतंर्गत चक्रधर कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे व आवश्यक ठिकाणी गटारीचे बांधकाम करणे, कमलनगर भागत गटारी तसेच रस्ते डांबरीकरण करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतंर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा ते कचरु मांग ते महादु ब्राहणे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व आवश्यक ठिकाणी गटारी बांधकाम करणे, अदिलखान ते सुशेश परदेशी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व गटारी बांधकाम करणे, सर्वसाधारण रस्ता अनदुानातंर्गत महावीर मेडीकल ते न्यु इंग्लीश स्कुलपर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचे ऑनलाईन भूमिपुजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आमदार किशोर पाटील यांनी नगरपरिषदेमार्फत करण्यात आलेल्या व येणा-या विविध विकास कामांची माहिती देऊन अडीअडचणीही मांडल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!