गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जळगावच्या डॉ.प्रियंका सोनी यांच्या कवितेचा समावेश
जळगाव –
सुवर्णपदक प्राप्त खेळाडू बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू यांच्या आयुष्यावर अभ्यास करीत जळगावच्या डॉ.प्रियंका सोनी प्रीत यांनी लिहिलेल्या कवितेचा समावेश गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे. सोनी यांना नुकतेच याबाबत पत्र प्राप्त झाले असून जिल्ह्यासाठी ही एक गौरवाची बाब आहे.
देशातील अर्जुन पुरस्कार प्राप्त विजेत्या खेळाडूंच्या जीवनाशी निगडित कवितांचे लिखाण करण्यासाठी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जळगावातील साहित्यिका डॉ.प्रियंका सोनी यांनी सुवर्णपदक प्राप्त खेळाडू पी.व्ही. सिंधू यांच्या जीवनाशी निगडित प्रत्येक घटनेची माहिती घेऊन आणि आयुष्यातील चढ-उतार यांची नोंद घेणारी कविता सादर केली होती. गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कवितेची दखल घेण्यात आली असून त्यांच्या कवितेची निवड करण्यात आली आहे. गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या या उपक्रमात जगभरातून १३३ कवी सहभागी झाले होते. सहभागी सर्व सदस्यांना गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डच्या माध्यमातून प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच एमएचआरडीद्वारा मान्यताप्राप्त संस्था स्पोर्ट्स अकॅडमी असोसिएशन ऑफ इंडिया, एचपीएएस इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशनकडून सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आले.
जळगाव शहरातील डॉ.प्रियंका सोनी यांच्या कवितेचे निवड झाली ही एक अभिमानास्पद बाब असून यामुळे जळगावचा गौरव होत आहे. डॉ.सोनी यांचे विविध माध्यमातून अभिनंदन करण्यात येत आहे.