लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात मिळणार सुट दस्त नोंदणीसाठी शनिवारी कार्यालये राहणार सुरु
जळगाव प्रतिनिधी-दि. 25
माहे एप्रिल व मे, 2021 या महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात सुट देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. माहे डिसेंबर, 2020 मध्ये शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीमुळे निष्पादीत झालेले म्हणजेच स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे दस्तावर पुर्ण झाले परंतु लॉकडाऊनमुळे माहे एप्रिल 2021 व माहे मे-2021 या महिन्यामध्ये नोंदणी न झालेली हस्तांतरण व विक्री करारनामा या दस्तावरील नोंदणी फीच्या दस्तांमध्ये प्रथम दोन महिन्यासाठी आणि जानेवारी, 2021 मध्ये निष्पादीत झालेले परंतु नोंदणी न झालेले दस्त व अशा दस्तांवरील नोंदणी फी चा दंड जो नोंदणी फी रक्कमेच्या कमीतकमी 2.5 पट व जास्तीत जास्त 10 पट इतका आहे, तो कमी करुन शासनाने एक हजार रुपये इतका निश्चित केला आहे.
या कालावधीत यापूर्वी दंडाचा भरणा करुन दस्त नोंदणी केली असल्यास दंडाचा परतावा मिळणार नाही. असे महसुल व वन विभागाचे सहसचिव श्रीधर डुबे पाटील यांनी गुरुवार, दिनांक 24 जून, 2021 रोजी जारी केलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.
शनिवार, दिनांक 26 जून, 2021 रोजी फक्त अशाच प्रकारचे दस्त नोंदणीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये उघडी ठेवण्यात येणार आहे. तरी संबंधीतांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे सह जिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.