स्वयंसिद्धा शिबिरामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत
रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे आयोजित कार्यक्रमात अंबादास मोरे यांचे प्रतिपादन
जळगाव-(प्रतिनिधी)
महिलांनी स्वरक्षणासाठी स्वयंसिद्धा शिबिरात विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतलेे. त्यामुळे आता या महिला संकट काळात स्वतःचा बचाव चांगल्या प्रकारे करू शकतात. याबाबत त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला असेल, असे मत पोलीस वेल्फेअर क्लबचे निरीक्षक अंबादास मोरे यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब जळगाव इलाईट, जिल्हा पोलीस दल व पोलीस स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त पोलीस स्पोटस् अकॅडमीच्या मैदानावर स्वयंसिद्धा शिबिर झाले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी मोरे बोलत होते. व्यासपीठावर अंबादास मोरे यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, लक्ष्मीकांत मणियार, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणास मदत-
या स्वयंसिद्धा शिबिरामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी मदत झाली. या शिबिरातील प्रशिक्षणामुळे महिला संकटाशी सामना करू शकतात आणि त्रास देणार्या समाजकंटकाला चांगला धडा शिकवू सुद्धा शकतात. या शिबिरात घेतलेल्या प्रशिक्षणाच्या सरावात सातत्य राहणे गरजेचे आहे. या शिबिरातील प्रशिक्षण इतरांना देखील द्या, असे मार्गदर्शन दीक्षित यांनी केले. या शिबिरात महिलांना कराटे, ज्युडो आदीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाबाबतची माहिती प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांनी दिली. याप्रसंगी प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. प्रशिक्षक अश्विनी निकम, जागृती काळे, सहप्रशिक्षक प्राजक्ता सोनवणे, सूर्यकांत अहिरे, तुषार टाक, स्विटी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अमित माळी यांनी केेले. आभार डॉ.वैजयंती पाध्ये यांनी मानले.