जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश .58 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीस पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जल जीवन मिशन समितीच्या बैठकीत मंजूरी

जळगाव- दि. 13 –

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश करुन या योजनांच्या खर्चासाठी लागणाऱ्या 58 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली.
पालकमंत्रीस्तरीय जल जीवन मिशन समितीची बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम, डॉ हर्षल माने यांचेसह जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, भविष्यात टंचाई भासणाऱ्या गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मागणी असून या योजना सन 2024 पर्यंत पूर्ण करावयाच्या असल्याने अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून योजनांची अंमलबजावणी करावी. तसेच मंजूर गावांच्या योजनांचे पाण्याचे स्त्रोत काळजीपूर्वक तपासून घ्यावेत. योजनांचे अंदाजपत्रक विहित कालावधीत तयार करण्यात यावेत. अंदाजपत्रकात कोणतीही बाब सुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी बैठकीत दिल्यात.
जिल्ह्यातील कोणत्याही गावास पाण्याची टंचाई भासू नये याकरीता यापूर्वीच जिल्ह्यातील 838 गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्यात आला असून त्याकरीता 947 कोटी 73 लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आता नव्याने 265 गावांचा समावेश केल्याने जिल्ह्यातील 1 हजार 103 गावांचा समावेश जलजीवन मिशन योजनेत होणार असून याकरीता 1 हजार 5 कोटी 89 लाख रुपयांचा सुधारित आराखडा होणार असल्याने आजच्या बैठकीत या आराखड्यासही मंजूरी देण्यात आली.
नव्याने समावेश केलेल्या 265 गावांची तालुकानिहाय संख्या
मुक्ताईनगर-17, अमळनेर-28, भडगाव-5, भुसावळ-11, बोदवड-17, चाळीसगाव-14, चोपडा- 33, धरणगाव- 21, एरंडोल-10, जळगाव- 8, जामनेर-24, पाचोरा-15, पारोळा-18, रावेर-31, यावल-13 असे एकूण 265 गावांचा समावेश करण्यात आला असून यात 98 गावांमध्ये रेट्राफिटींग तर 167 गावांमध्ये नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्यास 58 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील 1 हजार 103 गावांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!