अफगाणिस्तानात शुक्रवारच्या नमाजच्या वेळी बॉम्ब स्फोट! किमान 50 जणांचा मृत्यू तर 60 पेक्षा अधिक लोक जखमी, शिया समुदायाला लक्ष्य करून हल्ला

काबुल,

अफगाणिस्तानमध्ये शिया समुदायाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवण्यात आला. कुंडूज शहरात शुक्रवारच्या नमाजच्या वेळी हा हल्ला झाला असून यात 50 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाले आहेत. कुंडूजच्या सरकारी रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, ब्लास्टच्या सुरुवातीलाच 35 मृतदेह रुग्णालयात आणले गेले. यानंतर संख्या वाढत गेली. रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची अवस्था पाहता मृतांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.

डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्सच्या वतीने सुरू असलेल्या दुसर्‍या एका रुग्णालयात 15 मृतदेह पोहोचले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी सत्ता काबीज केली आहे. त्याच सरकारच्या प्रवक्त्याने मृतांचा नेमका आकडा माहिती नसल्याचे म्हटले आहे. पण, हल्ला प्रामुख्याने शिया समुदायाला लक्ष्य करूनच घडवण्यात आला. तसेच मृतांमध्ये सगळेच शिया असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

तालिबानने सत्ता ताब्यात घेतली तेव्हापासूनच त्यांचा प्रतिस्पर्धी दहशतवादी गट इस्लामिक स्टेटने सुद्धा अफगाणिस्तानात डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांत तालिबानची सत्ता अस्थिर करण्यासाठी त्यांनी अशा स्वरुपाचे हल्ले केले. शुक्रवारी कुंडूझमध्ये झालेला हल्ला त्याचाच एक भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुंडूजच्या शिया समुदायाच्या या मशीदीत शुक्रवारच्या नमाजसाठी शेकडो लोक एकत्रित आले होते. नमाज सुरू असतानाच हा बॉम्बस्फोट घडला. स्फोट इतका भयंकार होता की आसपासचे परिसर हादरून गेले. घटनास्थळावरून काही फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये मशीद परिसरातील भिंतींसह सर्वत्र रक्तपात दिसून येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!