स्मार्टवॉचने वाचवला तरुणाचा जीव, अपघातानंतर रस्त्यावर पडला होता बेशुद्ध
सिंगापूर
स्मार्टवॉचमुळे रुग्णाची मेडिकल कंडिशन लगेच समजली आणि रुग्णाचा जीव वाचला, अशा अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. पण चक्क अपघातग-स्त तरुणाचा जीव स्मार्टवॉचमुळे वाचल्याची घटना सिंगापूरमध्ये घडली आहे.
महंमद फित्री सिंगापूरच्या रस्त्यावरुन बाईकने जात असताना व्हॅनने जोरदार धडक दिली. त्याची बाईक घसरुन तो रोडवर निपचित पडला. यावेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. इतर कुणी मदतीला येण्यापूर्वी त्याच्या हाताला असलेल्या स्मार्ट वॉचने त्यांची परिस्थिती नेमकी टिपली. त्याची काहीच हालचाल होत नसल्याने स्मार्टवॉचने इमरजन्सी सर्व्हिसेसला फोन लावला. तसेच त्याचे नेमके लोकेशन कळवले.
स्मार्ट वॉचमधून कॉल गेल्यानंतर सिंगापूर सिव्हिल डिफेन्स फोर्सचे जवान लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फित्रीला रुग्णालयात दाखल झाले.
फित्रीच्या गर्लफ्रेंडने सांगितले, की अपघात झाला तेव्हा रस्त्यावर कुणीही नव्हते. स्मार्टवॉचने वेळीच संदेश पाठवला नसता तर त्याचा जीव वाचला नसता.