तालिबानचे सर्वोच्च नेते अखुंदजादा यांचा मृत्यू? बि-टनच्या मासिकाचा दावा, अफगाण सरकारनं दिलं उत्तर
काबुल
तालिबानचे सर्वोच्च नेते हैबतुल्लाह अखुंदजादा यांचा मृत्यू झाला आहे काय? बि-टनच्या एका मासिकानं दिलेल्या बातमीनुसार अखुंदजादा यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान मुल्ला बरादर यांना कंदाहारमध्ये कैद करण्यात आल्याची बातमीदेखील देण्यात आली आहे. या दोन्ही बातम्यांमुळे आंतरराष्ट्रीय विश्वात खळबळ उडाली आहे.
बि-टनमधील मासिक ‘द स्पेक्टॅटर’नं केलेल्या दाव्यानुसार अफगाणिस्तानात सत्तेसाठी सुरु असलेल्या संघर्ष आणि राजकारणात तालिबानचे सर्वोच्च नेते अखुंदजादा यांचा मृत्यू झाला आहे, तर उपपंतप्रधान मुल्ला बरादर यांना अटक करण्यात आली आहे. तालिबाननं मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे. आमचे सर्वोच्च नेते जिवंत आहेत आणि अगदी तंदुरुस्त आहेत, अशी प्रतिक्रिया तालिबाननं दिली आहे.
बि-टनमधील या मासिकाने केलेल्या दाव्यानुसार तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यातील सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून एकमेकांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच एकमेकांच्या सर्वोच्च नेत्यांना संपवून सत्तेचा अधिकाधिक वाटा आपल्याला मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सत्तेसाठी दोन्ही गटात हाणामारी झाल्याचं वृत्तही या मासिकानं दिलं आहे. तालिबानमध्येही दोन गट पडले असून एका क्षणी तर हक्कानी नेटवर्कच्या खलील-उल-रहमान-हक्कानी हे आपल्या खुर्चीतून उठले आणि त्यांनी बरादरवर लाथा बुक्क्यांनी हल्ला चढवल्याचं वृत्त या मासिकानं दिली आहे. अफगाणिस्तान सरकारमध्ये गैर तालिबानी घटकांना आणि अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व द्यावं, जेणेकरून आंतरराष्ट्रीय समुदायाची मान्यता मिळणे सोपे जाईल, असा मुद्दा बरादर मांडत होते.
तालिबानची सत्ता आल्यानंतरही अखुंदजादा गेल्या अनेक दिवसांपासून दिसलेले नाहीत किंवा त्यांच्याबाबत कुठलीही बातमी बाहेर आलेली नाही. त्यामुळे ते मृत्यूमुखी पडल्याचा दावा या मासिकाने केला आहे.