रवींद्रनाथ टागोर यांच्या लंडनमधील घराची होणार विक्री

लंडन

रवींद्रनाथ टागोर लंडनमधील ज्या घरात राहत होते, ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. 2,699,500 डॉलर म्हणजेच 27.3 कोटी रुपये भारताचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणार्‍या या इमारतीची किंमत निश्चित करण्यात आली आहे. मालमत्तेच्या किंमती आणि लंडनमध्ये घर ज्या ठिकाणी आहे, ते पाहून ही किंमत फार कमी असल्याचे म्हटले जात आहे. रवींद्रनाथ टागोर 1912 मध्ये काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील फब्लू प्लाकङ्ग इमारतीत राहिले होते. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2015 मध्ये लंडन दौर्‍यावर असताना राज्य सरकारतर्फे रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ममता बॅनर्जी 2015 मध्ये लंडनच्या पहिल्या भेटीदरम्यान म्हणाल्या होत्या की, ज्या घरी टागोर राहत होते, ते घर खरेदी करण्यास आमचे सरकार उत्सुक आहे. टागोर हे आमचा अभिमान आहेत. ही एक खासगी मालमत्ता आहे म्हणून, मी माझे उच्चायुक्त यांना विचारले होते की आपण या इमारतीसाठी सौदा करू शकतो का. त्यावेळी ही मालमत्ता विकली जाणार नव्हती, पण आता त्याची किंमत ठरवण्यात आली आहे.

निळ्या रंगाचा फलक या घरावर लावण्यात आलेला असून प्रसिद्ध भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर येथे राहत असत, असे त्यावर लिहिलेले आहे. लंडन कंट्री कौन्सिलने हा फलक लावला होता. दरम्यान, या घराची जबाबदारी आता इंग्लिश हेरिटेज ट्रस्टवर आहे. टागोर वगळता इतर काही भारतीयांची नावे असलेले निळे फलकही लंडनमध्ये लावण्यात आले आहेत. ज्यात महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, अरबिंदो, बाळ गंगाधर टिळक, व्ही.डी. सावरकर आणि व्ही. कृष्णा मेनन यांचा समावेश आहे. भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर, 1861-1941 आणि 1912 मध्ये इथे राहिले होते, असं त्या फलकावर लिहिलेले आहे.

हे घर खरेदी करण्यास पश्चिम बंगाल सरकारने उत्सुकता दाखवल्यानंतर भारतीय वंशाचे बि-टीश उद्योगपती स्वराज पॉल यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, हे घर भारत सरकार किंवा पश्चिम बंगाल सरकार खरेदी करू शकते. जेव्हा ममता बॅनर्जी 2015 मध्ये, लंडनला गेल्या, तेव्हा स्वराज पॉल यांनी त्यांना चहासाठी आमंत्रित केले होते. पॉल म्हणाले की, टागोर बिल्डिंग खरेदी करण्यासाठी सरकार एक समितीही बनवू शकते आणि जर त्यात माझा समावेश असेल, तर मला आनंद होईल, असेही ते म्हणाले.

ट्रस्टच्या मते रवींद्रनाथ टागोर हिथवरील घर क्रमांक 3 मध्ये 1912 वर्षात उन्हाळ्यातील काही महिने येथे राहिले आहेत. लंडनच्या तिसर्‍या भेटीदरम्यान ते येथे राहिले होते. त्यावेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था कलाकार आणि लेखक सर विल्यम रोथेनस्टाईन यांनी केली होती. सर विल्यम तेव्हा 11 ओक हिल पार्क मध्ये राहत होते. पण, आता त्यांचे निवासस्थान पाडले गेले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!