रक्तपात! तालिबाननं पुन्हा मोडलं वचन, पंजशीरमध्ये 20 जणांची हत्या
काबुल,
अफगाणिस्तानमध्ये सत्ता आल्यानंतर तालिबानचे खरे रंग जगाला दिसायला सुरुवात झाली आहे. पंजशीरमध्ये सत्ता मिळवल्यानंतर तालिबाननं तिथल्या 20 निष्पाप नागरिकांची निघृर्ण हत्या केली आहे. बीबीसी न्यूजनं दिलेल्या बातमीनुसार यात एका दुकानदाराचा समावेश आहे. या नागरिकांचा तालिबानविरोधातील कुठलाही सहभाग नसताना केवळ संशयाच्या बळावर या सर्वांची हत्या करण्यात आली आहे.
पंजशीरवर ताबा मिळवल्यानंतर तालिबाननं एका दुकानदाराची तालिबान विरोधक रेजिस्टंट फोर्सला सिमकार्ड विकल्याबद्दल हत्या केली आहे. तालिबानी फायटर्सनी जेव्हा या दुकानदाराचं अपहरण केलं, तेव्हा त्याने आपण एक गरीब दुकानदार असल्याचं सांगत आपला तालिबानच्या लढाईशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र या दुकानदाराने रेजिस्टंट फोर्सला सिमकार्ड विकल्याच्या केवळ संशयावरून त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचं शव त्याच्या घराबाहेर फेकून देण्यात आलं. या दुकानदारानं तालिबानींना आपलं नाव आणि ओळखपत्र दाखवूनही तालिबानींनी त्याला सोडलं नाही.
तालिबानने मात्र या हत्या झाल्यानंतरही हात वर केले आहेत. आपण कुठल्याही निरपराध नागरिकांच्या जीविताला धक्का पोहोचवला नसल्याचं तालिबाननं म्हटलं आहे. पंजशीरवर ताबा मिळाल्यानंतर तिथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाला कुठलाही धोका नसून त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई करणार नसल्याचं तालिबानच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र तिथल्या 20 नागरिकांची तालिबाननं हत्या केल्याचं समोर आलं आहे. 15 ऑॅगस्ट रोजी काबुलवर ताबा मिळवलेल्या तालिबानने महिलांचे अधिकार अबाधित राहतील, असं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात महिलांना घराबाहेर पडताच येऊ नये, अशी परिस्थिती तालिबानकडून जाणीवपूर्वक तयार केली जात आहे. तालिबानच्या सरकारमध्ये एकाही महिलेला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. आपल्या अधिकारांसाठी तिथल्या महिलांना आंदोलन करावं लागत आहे.