बर्न्स-हमीदचे अर्धशतक, इंग्लंडची पहिल्या दिवसाअखेर भारतावर 42 धावांची आघाडी
हेडिंग्ले,
भारतीय क्रिकेट संघाने तिसर्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघासमोर सपशेल लोटांगण घातले आहे. जेम्स अँडरसन, क्रेग ओवरटन, ओली रॉबिन्सन आणि सॅम कुरेनच्या भेदक मार्यासमोर भारतीय दिग्गजांनी शरणागती पत्कारली आणि भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या दिवसाअखेर बिनबाद 120 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंड संघाची पहिल्या डावात 42 धावांची आघाडी झाली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इंग्लंडच्या गोलंदाजांनी स्विंग होत असलेल्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. सलामीवीर केएल राहुल पहिल्याच षटकात माघारी परतला. जेम्स अँडरसनने त्याला बाद केले. त्यानंतर त्यानं आणखी दोन फलंदाजांना बाद करत भारताची अवस्था 3 बाद 21 अशी केली. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीचा खराब फॉर्म या सामन्यात देखील कायम राहिला. अवघी एक धाव करून पुजारा यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली 7 धावा काढून बाद झाला.
जेम्स अँडरसनच्या तडाख्यानंतर ऑॅली रॉबिन्ससन याने भारताच्या दोन शिलेदारांना माघारी पाठवले. त्याने अजिंक्य रहाणे (18) आणि ॠषभ पंत (2) यांना बाद केले. अशात रोहित शर्मा दुसर्या बाजूने संयमी खेळ करून खिंड लढवत होता. त्याला ओवरटन याने बाद केले. रोहित 105 चेंडूत 19 धावा काढून बाद झाला. ओवरटन यानेच रोहित पाठोपाठ मोहम्मद शमीला देखील आल्या पावले माघारी पाठवले. तेव्हा भारताची अवस्था 7 बाद 67 अशी झाली.
जेम्स अँडरसन आणि ऑॅली रॉबिन्सनच्या सॅम कुरेनने भारतीय संघावर तोफ डागली. त्याने एका षटकात सलग दोन धक्के दिले. रविंद्र जडेजा (4) आणि जसप्रीत बुमराह (0) यांची त्याने शिकार केली. यानंतर ओवरटन याने सिराजला (3) बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओवरटन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर ओली रॉबिन्सन आणि सॅम कुरेन यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
सलामीवीर रोहित शर्मा (19) आणि अजिंक्य रहाणे (18) वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाही. भारताकडून सर्वाधिक 35 धावांची भागीदारी रोहित-रहाणे या जोडीने चौथ्या गड्यासाठी केली. भारताचा पहिला डाव 78 धावात आटोपल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी यजमान संघाला दणकेबाज सलामी दिली. रोरी बर्न्स आणि हासिब हमिद या दोघांनी वैयक्तिक नाबाद अर्धशतक झळकावले. पहिल्या दिवसांचा खेळ संपला तेव्हा रोरी बर्न्स 52 तर हासिब हमीद 60 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे इंग्लंडचा संघ गुरुवारी पहिल्या डावात कितपत मजल मारेल, याची उत्सुकता आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : 40.4 षटकांत सर्व बाद 78 (रोहित शर्मा 19, अजिंक्य रहाणे 18, जेम्स अँडरसन 36, क्रेग ओवरटन 314, ऑॅली रॉबिन्सन 216, सॅम करन 227)
इंग्लंड (पहिला डाव) : 42 षटकांत बिनबाद 120 (रोरी बर्न्स नाबाद 52, हसीब हमीद नाबाद 60)