पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीसोबत तालिबानची बैठक, दोन्ही गटांनी घेतला मोठा निर्णय

काबूल,

तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेऊन 10 दिवस झाले आहेत. तालिबाननं जवळपास सर्वच प्रांतावर आपला ताबा मिळवला आहे. पण अफगाणिस्तानमधील एक प्रांत अद्याप तालिबानच्या ताब्यात आलेला नाही. तो प्रांत म्हणजे पंजशीर व्हॅली. पंजशीर याठिकाणी तालिबानला नॉर्दर्न आघाडीकडून कडवं आव्हान मिळत आहे. त्यामुळे पंजशीर याठिकाणी मोठा हिंसाचार घडल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. यानंतर आता संबंधित दोन्ही गटात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबान आणि नॉर्दन आघाडीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

तालिबान आणि पंजशीरचे प्रतिनिधी यांच्यात परवान प्रांताची राजधानी चारीकर याठिकाणी एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला न करण्याला (सीजफायर) सहमती दर्शवली आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानच्या वतीने या चर्चेचं नेतृत्व मौलाना अमीर खान मुक्तई यांनी केलं आहे. तसेच तालिबाननं या बैठकीला ’अमन जिरगा’ असं नावही दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात अफगाणिस्तानातील हिंसाचार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बैठकीत पंजशीरच्या नॉर्दन आघाडीचं नेतृत्व माजी अफगाणिस्तान कमांडर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद यांनी केलं आहे. स्वयंघोषित काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्ला सालेह देखील या बैठकीत उपस्थित होते. दोघंही तालिबानच्या विरोधात नॉर्दर्न आघाडीच्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

तत्पूर्वी, अहमद मसूद यांनी म्हटलं आहे की, काहीही झालं तरी तालिबानला शरण जाणार नाही, पण त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे. याबाबत मसूद यांची एक मुलाखत बुधवारी फ्रेंच मासिकात प्रकाशित झाली आहे. तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत मसूद यांनी म्हटलं की, ’मी आत्मसमर्पण करण्यापेक्षा मरणं पसंत करेन. मी अहमद शाह मसूदचा मुलगा आहे. माझ्या डिक्शनरीत आत्मसमर्पण हा शब्दच नाही.’ दरम्यान बुधवारी पंजशीरसाठी जाणारं अन्न आणि इंधनाचा पुरवठा बंद केल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण आज तालिबानकडून ही बाब फेटाळून लावली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!