टोलो न्यूजच्या पत्रकाराला तालिबान्यांकडून मारहाण; देशातील गरिबीचे रिपोर्टिंग करत असल्याचं कारण
काबुल
अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काहीच दिवसात तालिबान्यांनी आपला मूळ रंग दाखवायला सुरुवात केली आहे. देशातील गरीबी आणि बेरोजगारीचे रिपोर्टिंग करणार्या टोलो न्यूजचा पत्रकार झियार खान याद आणि त्याच्या कॅमेरामनला तालिबान्यांनी जबर मारहाण केली आहे. सुरवातीला झियार खान यादच्या हत्येची बातमी पसरली होती. पण हे वृत्त खोटं असल्याचं स्वत: झियार खान यादने स्पष्ट केलं.
टोलो न्यूजचा पत्रकार झियार खान याद हा काबुलमध्ये रिपोर्टिंग करत होता. त्यावेळी काही तालिबानी दहशतवादी त्याच्या जवळ आले आणि त्यांनी झियार खान यादला जबर मारहाण केली. यावेळी झियार खान यादच्या कॅमेरामनलाही मारहाण करण्यात आली. यावेळी झियार खान याद हा अफगाणिस्तानच्या गरिबी आणि बेरोजगारीचे रिपोर्टिंग करत असल्याची माहिती आहे.
सुरुवातीला झियार खान यादच्या मृत्यूची अफवा पसरवली होती. नंतर या वृत्ताचं खंडन त्याने स्वत: केलं. झियार यादने आपल्या टवीटमध्ये म्हटलं आहे की, ‘मला तालिबान्यांनी मारहाण केली, माझ्या कॅमेरामनलाही मारहाण करत सर्व साहित्याची नासधूस केली. माझा मोबाईलही काढून घेतला. काही जणांकडून माझ्या मृत्यूची अफवा पसरवण्यात आली. तालिबान्यांनी केवळ बंदुकीचा धाक दाखवून मला मारहाण केली.‘
त्यानंतर आणखी एका टवीटमध्ये झियार याद म्हणतो की, ‘मला त्या लोकांनी का मारहाण केली हे माहित नाही. मी तालिबानच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केली आहे. पण अद्याप आरोपींना पकडण्यात आलं नाही आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हाणीकारक आहे.‘
अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करत असलेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांची तालिबान्यांकडून 16 जुलैला हत्या करण्यात आली होती. दानिश सिद्दीकी अफगाणिस्थानमधील परिस्थिती कव्हर करण्यासाठी अफगाणिस्थानात गेले होते. दानिश सिद्दीकी मूळचे दिल्लीतील रहिवाशी होते. दानिश सिद्दीकी यांची हत्या कांधार प्रांतातील स्पिन बोल्डक परिसरात करण्यात आली होती.