टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑॅस्ट्रेलिया संघाची घोषणा, कॅप्टन्सी कोणाकडे?
मेलबर्न,
टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप 2021 ला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या टी 20 वर्ल्ड कपची क्रिकेट चाहते आवर्जून वाट पाहत आहेत. 17 ऑॅक्टोबरपासून या बहुप्रतिक्षित टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला दुबई आणि ओमानमध्ये सुरुवात होत आहे. या महत्वाच्या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय ऑॅस्ट्रेलिया टीमची घोषणा करण्यात आली आहे. यात 12 मुख्य खेळाडूंसह 3 राखीव खेळाडूंचा समावेश आहे. या संघात तोडीस तोड खेळाडू आहेत. या टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी ही एरॉन फिंचच्या खांद्यावर असणार आहे.
अशी आहे कांगारुंची टीम
क्रिकेट ऑॅस्ट्रेलियाने निवडलेली 15 सदस्यीय संघ हा परिपूर्ण आहे. यामध्ये बॅटसमन, बोलर आणि उत्तम फिल्डर्सचा समावेश आहे. वर्ल्ड कपच्या निमित्ताने टी 20 टीममध्ये स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्सचं कमबॅक झालं आहे. स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि पॅट कमिन्सने वेस्टइंडिज आणि बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. जोश इंग्लिसचा संघात विकेटकीपर मॅथ्यू वेडचा बॅकअप म्हणून समावेश केला आहे.
ऑॅस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण 5 वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केलाय. मात्र त्यांना अद्याप एकदाही टी 20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे यावेळेस वर्ल्ड कप जिंकून ही उणीव भरुन काढण्याचा मानस ऑॅस्ट्रेलियाचा असणार आहे. स्टीव्ह स्मिथला दुखापतीनंतरही संघात कायम ठेवण्यात आले आहे. तर डॅन क्रिस्टियन, नॅथन एलिस आणि डॅनियल सॅम्सचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे. फिरकीची जबाबदारी ही एश्टन एगर, मिशेल स्वेपसन आणि एडम झॅम्पाच्या खांद्यावर आहे.
तोडीस तोड गोलंदाज
वेगवान गोलंदाजची धुरा ही मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन आणि जोश हेझलवूडकडे आहे. ‘आम्ही या स्पर्धेत नक्कीच चांगली कामगिरी करु. आमच्याकडे जागतिक स्तरावरचे खेळाडू आहेत जे एक संघ म्हणून टी 20 मध्ये सर्वश्रेष्ठ टीम विरुद्ध उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी व्यक्त केला. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार असून 17 ऑॅक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. ऑॅस्ट्रेलियाचा सलामीचा सामना हा 23 ऑॅक्टोबरला दक्षिण अफ्रिका विरुद्ध होणार आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2021 साठी टीम ऑॅस्ट्रेलिया
एरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, एश्टन एगर, जोश हेझलवुड, जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि एडम झॅम्पा.
राखीव खेळाडू : डॅन क्रिश्चन, डॅनियल सॅम्स आणि नॅथन एलिस