सैन्यात भरती होण्यासाठी सर्टीफिकेट मिळविताना नेपाळ येथील कबड्डी स्पर्धेत कमविले सुवर्णपदक

पोलादपूर,

गरीबी, मेहनत आणि शिक्षणापासून वंचित समाजात जन्म घेऊन वडीलांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्नं बघणार्‍या अभिषेक लहू पवार या तरूणाला क्रीडानैपुण्याचे सर्टीफिकेट नसल्याने दोन वेळा सैन्यभरतीपासून वंचित राहावे लागले होते. कबड्डी हा मातीतील उपजत मैदानी खेळ खेळण्याचे कसब अंगी असूनही या खेळातून राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठीचे मार्गदर्शन शालेय शिक्षणासोबत न मिळाल्याने अभिषेक याने संयुक्त भारतीय खेळ फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी खेळाचे प्रशिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये नेपाळच्या संघाचा पराभव करीत सुवर्णपदकाची कमाईही केली. आता या सुवर्णपदकासोबत मिळालेले सर्टीफिकेट सैन्यात भरती होताना उपयोगी ठरते काय, याचीच प्रतिक्षा अभिषेक तिसर्‍यांदा सैन्यभरतीला उभे राहण्यापूर्वी करीत आहे.

वडील लहू सायबू पवार बेलदार समाजाचा पारंपरिक दगड फोडण्याचा व्यवसाय करीत असत तर कधी बांधकाम करायला जात असत आणि आई वंदना पवार पोलादपूर ग्रामपंचायतीवर सदस्य निवडून आली होती. अशातच अभिषेक शाळेत नियमित जात असताना खेळाची आवडही जोपासली होती. लहू पवार यांना मुलगा मोठा होऊन आर्मीत जावा असे वाटत असे. अभिषेक यानेही वडीलांचे स्वप्नं पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर प्रत्यक्ष थेट सैन्यभरतीसाठी पनवेल आणि मुंब-ा येथे जाऊनही क्रीडाविषयक सर्टीफिकेट नसल्याने अभिषेक याची निवड झाली नाही.

कबड्डी खेळ लहानपणापासून येत असल्याने संयुक्त राष्ट्रीय भारतीय खेळ फाऊंडेशन या संस्थेमार्फत राष्ट्रीय खेळाचे मार्गदर्शन घेऊन अभिषेक याने आर्मीमध्ये भरती होण्यासाठी आवश्यक असलेले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धेतील सर्टीफिकेट मिळविण्याच्या हेतूने अथक सराव केला आणि दक्षिण भारतातील चेन्नई येथील काही तरूण आणि कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील काही तरूणांचा संघ तयार करून संयुक्त राष्ट्रीय भारतीय खेळ फाऊंडेशनमार्फत नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पाठविण्याचे ठरले. या संघामध्ये अभिषेक लहू पवार याची निवड झाली. लहानपणापासून मातीतला खेळ खेळणारा अभिषेक नेपाळ येथील कबड्डी स्पर्धेमध्ये मॅटवर कबड्डी खेळताना अधिकच चपळपणे चढाई आणि आक्रमण करीत अष्टपैलू खेळ दाखवू लागल्याने प्रेक्षकांसह कबड्डीपटूंची प्रशंसा मिळवू लागला. अंतिम सामन्यामध्ये अभिषेकने सफाईदार खेळ करीत भारतातून गेलेल्या त्याच्या कबड्डी संघाला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. आयोजकांनी अभिषेक पवार याचा सुवर्णपदक प्रदान करून विशेष गौरव केला.

मात्र, आता या सुवर्णपदकासोबत मिळालेले सर्टीफिकेट सैन्यभरतीसाठी उपयोगी ठरते काय, याचाच विचार करीत अभिषेक आता पुढील काळात सैन्यभरतीसाठी सज्ज होण्याची तयारी करीत आहे. अभिषेकच्या यशाचे पोलादपूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असले तरी तो मात्र वडीलांचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झटत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!