गोल्डन बॉय नीरज चोप्रा रुग्णालयात, पानीपतमधला कार्यक्रम अर्धवट सोडला
पानीपत,
टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्डन मेडल जिंकवून देणार्या नीरज चोप्राला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पानीपतमधला सत्कार समारंभ अर्धवट सोडून नीरजला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नीरज तापाने फणफणला आहे. ताप आल्यामुळे नीरजची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. सुदैवाने त्याची ही टेस्ट निगेटिव्ह आली. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे नीरज स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातही सहभागी झाला होता.
ऍथलिटिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. टोकयो ऑलिम्पिकमध्ये नीरजने 87.58 मीटर लांब भाला फेकत गोल्ड मेडल पटकावलं. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार नीरजचे मित्र आणि त्याच्या कुटुंबाने त्याला रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पानीपतमध्ये सुरू असलेल्या सत्कार समारंभावेळी नीरजची तब्येत बिघडली, त्यामुळे तो व्यासपीठावरून खाली उतरला. दिल्लीवरून पानीपतला तो कार रॅलीने आला. 3 तासांच्या या प्रवासाला सहा तास लागले.
ताप असल्यामुळे नीरजला औषधं सुरू होती. ऑलिम्पिकवरून आल्यानंतर नीरज खूप व्यस्त आहे, त्यामुळे त्याच्यावर तणाव आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतात आलेल्या नीरजला अजून घरीदेखील जाता आलेलं नाही.
’घरी आल्यानंतर नीरजचं जल्लोषात स्वागत केलं जाईल. मी त्याच्यासाठी चुरमा बनवला आहे. नीरजला मिळालेलं गोल्ड मेडल आम्ही मंदिरात ठेवणार आहोत, कारण देवामुळेच आम्हाला हा ऐतिहासिक क्षण पाहता आला. मी त्याच्या घरी येण्याची वाट पाहत आहे,’ अशी प्रतिक्रिया नीरजची आई सरोज यांनी मीडियाशी बोलताना दिली.