तालिबान विरोधात फेसबुकचं मोठं पाऊल; तालिबान समर्थनार्थ सर्व अकाऊंटस बॅन
न्यूयॉर्क,
तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता काबिज करुन आपला झेंडा फडकवला आहे. अफगाणिस्तानचं नवं सरकार म्हणून तालिबानने स्वत:ला घोषित केलं आहे. मात्र जगभरातील देश तालिबान्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत. जगभरातून राष्ट्र प्रमुखांच्या प्रतिक्रिया, अफगाणिस्तानमधील चिघळलेली परिस्थिती तालिबान्यांना विरोध करण्यास पुरेशी आहे. आता फेसबुकनेही तालिबानला आपल्या प्लॅटफॉर्मवरून बॅन केलं आहे. अमेरिकन कायद्यांन्वये तालिबान एक दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे आम्ही त्यांची सेवा बंद करत आहोत, असं फेसबुकच्या प्रवक्तांनी म्हटलं आहे.
फेसबुकने एक परिपत्रक जारी करत म्हटलं की, आमच्या धोरणांनुसार, दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्ववर स्थान दिले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तालिबान किंवा त्याच्याशी संबंधित कोणतेही अकाऊंट, पोस्ट फेसबुकवर दाखवली जाणार नाही.
आम्ही आमच्या टीममध्ये अफगाणिस्तानमधील तज्ञांचा समावेश केला आहे, ज्यांना पश्तो आणि डारी भाषेची माहिती आहे. जेणेकरून तालिबानला पाठिंबा देणारी कोणतीही पोस्ट आल्यास त्यावर कारवाई करता येईल. अनेक तालिबान प्रवक्ते, नेते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह आहेत. यापैकी अनेकांची फेसबुक, टिवटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंटस आहेत. तिथून ते सातत्याने स्टेटमेंट जारी करतात. आता फेसबुकने ही कारवाई केल्याने प्रत्येकाच्या नजरा टिवटरसह इतर प्लॅटफॉर्मवर आहेत.