अमेरिकेतील आशियाई नागरिकांची संख्या वाढली, एकूण लोकसंख्येत वाटा 7.2 टक्के
वॉशिंग्टन,
गेल्या दशकात अमेरिकेतील आशियाई वंशाच्या नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या दशकात अमेरिकेत सर्वाधिक वेगाने वाढणारा अल्पसंख्याक समुदाय म्हणून आशियाई समुदाय समोर आल्याचे यातून दिसून आले आहे.
अमेरिकेतील 2.4 कोटी नागरिक आशियाई
2010 ते 2020 आशियाई अमेरिकन नागरिकांची संख्या वाढून 2.4 कोटींवर पोहोचल्याचे अमेरिकेच्या जनगणना मंडळाच्या गुरूवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. 2020 मध्ये अमेरिकेतील आशियाई नागरिकांची संख्या 2 कोटी 40 लाखांवर पोहोचली आहे. यासोबतच आशियाई नागरिकांची लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 7.2 टक्के इतकी झाली आहे.
गौरवर्णीयांची संख्या घटली
अमेरिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच इथे गौरवर्णीय अमेरिकी नागरिकांची संख्या घटल्याचेही दिसून आले आहे. सध्या अमेरिकेतील नॉन-हिस्पॅनिक गौरवर्णीयांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 58 टक्के इतकी आहे. जनगणनेला सुरूवात झाल्यानंतर प्रथमच गौरवर्णीयांची संख्या 60 टक्क्यांच्या खाली आली आहे. 2000 मध्ये इथल्या नॉन-हिस्पॅनिक गौरवर्णीयांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 69 टक्के तर 2010 मध्ये 63.7 टक्के इतके होते.
1930 नंतर प्रथमच लोकसंख्या वाढीचा वेग घटला
गेल्या दशकात अमेरिकेतील लोकसंख्या 7.4 टक्क्यांनी वाढून 33.1 कोटींवर पोहोचली आहे. 1930 नंतर अमेरिकेतील लोकसंख्यावाढीचा हा सर्वात कमी वेग असल्याचेही यात म्हटले आहे.