तालिबान नियंत्रित भागातून 3 भारतीय अभियंत्यांची सुटका; भारतीय दूतावासानं केलं एअरलिफ्ट
काबूल,
अमेरिकनं आपलं सैन्य माघारी घेतल्यापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती चिघळत आहे. यावर्षी मे महिन्यांत अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी घेताच अफगाणिस्तानाच युद्धाला तोंड फुटलं आहे. अमेरिकन सैन्य माघारी जात नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना तालिबानने हिंसक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस तालिबान आपली ताकद वाढवत असून एक-एक शहर आपल्या ताब्यात घेत आहेत. तालिबाननं आतापर्यंत अफगाणिस्तानातील जवळपास 80 टक्के क्षेत्र काबीज केला आहे.
तालिबाननं कंधार, गझनी, हेरात अशा महत्त्वाच्या शहरांवर आपला ताबा मिळवला आहे. अशात तालिबानचं नियंत्रण असलेल्या अफगाणिस्तानातील एका भागातून तीन भारतीय अभियंत्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासानं दिली आहे. या तिन्ही जणांना एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. संबंधित अभियंते एका धरण प्रकल्पावर काम करत होते. दरम्यान तालिबाननं या भागावर ताबा मिळवला. त्यामुळे हे तिन्ही अभियंते याच भागात अडकून पडले होते.
याची माहिती अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं पावलं उचलत, संबंधित तिन्ही अभियंत्याची सुखरुप सुटका केली आहे. या तिन्ही भारतीय अभियंत्यांना विमानाच्या मदतीनं सुरक्षितपणे काबूलपर्यंत आणण्यात आलं आहे. खरंतर, यापूर्वीच भारत सरकारकडून अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्शभूमीवर भारतानं एक विशेष विमान देखील अफगाणिस्तानला पाठवलं होतं.
अफगाणिस्तानात तालिबानच्या वाढत्या नियंत्रणामुळे देशातील जवळपास 4 लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. तर जगभरातील विविध देशांचे नागरिक अफगाणिस्तानात अडकून पडले आहे. संबंधित देश आपापल्या नागरिकांना वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. तसेच अमेरिकेनं 3000 हजार सैन्य पुन्हा अफगाणिस्तानात पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय अमेरिकेच्या नागरिकांना अफगाणिस्तानातून मायदेशात परतण्यास कोणतीही आडकाठी केली, तर अमेरिकन सैन्य तातडीनं कारवाईच्या पावित्र्यात उतरणार असल्याचा इशारा पेंटागनकडून देण्यात आला आहे.