रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामी जोडीची विक्रमी भागीदारी
लंडन,
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या ऐतिहासिक लॉर्ड क्रिकेट ग-ाऊंडवरखेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर मुंबईकर रोहित शर्माने शानदार कामगिरी केली आहे. रोहितने एकूण 145 चेंडूत 11 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 83 धावांची खेळी केली. रोहितचं शतक अवघ्या 17 धावांनी हुकलं. जर रोहितने शतक ठोकलं असतं, तर तो अशी कामगिरी करणारा 10 वा भारतीय ठरला असता. रोहितचं लॉर्डवर शतक करण्याचं स्वप्न भंगलं असतं तरी रोहित आणि केएल राहुल या सलामी जोडीने विक्रमी कामगिरी केली आहे.
विक्रमी सलामी भागीदारी
इंग्लंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडले. केएल राहुल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. या जोडीने 126 धावांची सलामी भागीदारी केली. यासह दोघांनी विक्रमी भागीदारी केली. भारताकडून लॉर्डवर पहिल्या डावात 1952 नंतर पहिल्यांदा 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्यात आली आहे. एका बाजूला रोहित फटकेबाजी करत होता. तर दुसर्या बाजूला केएल राहुलने रोहितला चांगली साथ दिली.
रोहित आणि राहुलच्या आधी भारताकडून लॉर्डवर 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी ही 1952 मध्ये केली गेली होती. ही भागीदारी पंकज रॉय आणि वीनू मांकड या सलामी जोडीने केली होती. तेव्हा या जोडीने 100 धावांची पार्टनरशीप केली होती. रोहित आणि राहुलने अनेक वर्षानंतर पहिल्या विकेटसाठी 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
शतकी भागीदारी करणारी दुसरी सलामी जोडी
दरम्यान रोहित आणि राहुल ही दुसरीच जोडी आहे ज्यांनी 1980 नंतर टीम इंडियाकडून सलामी शतकी भागीदारी केली आहे. याआधी 2007 मध्ये वसीम जाफर आणि दिनेश कार्तिकने पहिल्या विकेटसाठी 100 धावा केल्या होत्या.