वसुंधरेच्या संरक्षणाकरीता एरंडोल नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम
एरंडोल प्रतिनिधी (प्रमोद चौधरी)
‘एरंडोल वृक्ष बँक’ स्थापनेची गरज:
वृक्षांचे आपल्या जीवनात अनन्य् साधारण महत्व आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. हवामान बदल व जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मींग) मुळे आज सर्व जीवसृष्टी संकटात सापडलेली आहे. निसर्गाचा बिघडलेला हा समतोल सुधारण्यासाठी जगभर संघटित प्रयत्न होणे गरजेचे आहे. यातील अनेक मार्गांपैकी वृक्षारोपण व संवर्धन हा निसर्ग संवर्धनाचा उत्तम मार्ग आहे. नेमकी हीच बाब ओळखून एरंडोल नगरपरिषेने वसुंधरेच्या संरक्षणाकरीता “वृक्ष बँक” स्थापनेचा अभिनव प्रयोग सुरु केला आहे. त्याची सुरवात शहरातील अभियंता ग्रुप ने 50 देशी फळझाडे नगरपरिषदेला सुपूर्द करून केली..
स्थापनेचा प्रमुख उद्देश:
शहरातील नागरिकांकडून झाडांची रोपे स्विकारून नगरपरिषदेमार्फत शहरात विविध ठिकाणी त्यांची लागवड व जतन करून एरंडोल शहरास स्वच्छ सुंदर व हरित बनविणे हा या वृक्ष बँकेचा प्रमुख उद्देश आहे.
संकल्पना:
नेहमीच्या बँकेत ज्याप्रमाणे आपण पैश्यांच्या स्वरूपात ठेवी ठेवतो आणि काही वर्षांनी त्यापासून काहीतरी रिटर्न मिळतील अशी अपेक्षा ठेवतो. त्याचप्रमाणे या वृक्ष बँकेत प्रत्येकाने वृक्षांची रोपे आणि संरक्षण जाळ्या भेट देऊन ठेवीच्या स्वरूपात ठेवायची असून या रोपांना नगरपरिषदेमार्फत शहरात विविध ठिकाणी लावून त्यांचे संवर्धन केले जाईल. दर 6 महिन्यांनी रोपांची होणारी वाढ छायाचित्रांसह संबंधित रोपांच्या ठेवीदारांना पाठवले जातील.
काही वर्षांनी या वाढलेल्या वृक्षांपासून थंड सावली,ऑक्सिजन चा पुरवठा,जमिनीची धूप कमी होण्यास मदत,पाण्याची भूजल पातळी वाढण्यास मदत अश्या स्वरूपात रिटर्न्स मिळतील आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टी फक्त ठेवीदारांनाच नाही तर शहरातील सर्व नागरिकांना व भावी पिढीनासुद्धा मिळतील.
लोकसहभाग वाढविण्यासाठीची आयडिया:
वृक्ष बँकेस रोपे भेट देणा-या सर्व संस्था, नागरिक यांचे रेकॉर्ड जतन केले जाईल व त्यांच्या नावांना प्रसिद्धी दिली जाईल. त्याचप्रमाणे रोपांच्या संरक्षणासाठी लावण्यात येणा-या संरक्षण जाळींची भेट देणाऱ्यांची नावे त्यावर लावण्यात येतील.
तरी या उपक्रमात सहभागी होऊन एरंडोल शहर स्वच्छ, सुंदर व हरित एरंडोल करण्यास नगरपरिषदेस सहकार्य करावे ही विनंती.
मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल