गुरांसाठी न्यायालय उघडले रात्री साडेदहा वाजता.
धरणगाव प्रतिनिधी, हर्षल चौहान.
पोलिसांनी जप्त केलेली गुरे गोशाळेतच राहू द्यावी, या मागणीसाठी गोवंशप्रेमी नागरिकाने शनिवारी थेट धरणगाव न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. विशेष म्हणजे या सुनावणीसाठी धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच शनिवारी रात्री साडेदहा वाजता न्यायालय उघडण्यात आले. या पशुधनाबाबत वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश न्या. न्या. एस. डी. सावरकर यांनी पोलिसांना दिले.
धरणगाव व पाळधी भागात धरणगाव पोलिसांच्यावतीने राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत ३४ गुरे आढळली होती. त्यापैकी २० गुरे धरणगाव व १४ गुरे पारधी दूरक्षेत्र हद्दीत आढळली होती.
या पशुधनाची रवानगी गोशाळेत करण्यात आली होती. इकडे मात्रही गुरे मूळ मालकांना परत देण्यात यावीत, अशा सूचना पोलिसांकडून गोशाळेला करण्यात आली.
यावर गोवंश प्रेमी श्रीपाद पांडे यांनी या पशुधनाला गोशाळेतच राहू द्यावे अशी याचिका धरणगाव न्यायालयात अॅड. राहुल पारेख यांच्यामार्फत शनिवारी रात्री दाखल केली. रात्रीच घेतली सुनावणी
न्या. एस.डी. सावरकर यांनी या याचिकेवर शनिवारी रात्री १०.३० वाजता सुनावणी घेतली आणि गुरांची परिस्थिती व जप्तीबाबत वस्तूनिष्ठ अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश धरणगाव पोलिसांना दिले. याबाबत पुढील सुनावणी सोमवार २ रोजी होणार आहे.
आता न्यायालयाने आदेश दिला असला तरी त्याची प्रत नव्हती. त्यावर डॉ. पारेख यांनी सेल्फ अटेस्टेड अर्ज पांडे यांच्यामार्फत पोलिसांकडे रात्री अकरा वाजता दिला. शेवटी रविवारी सकाळी पांडे आणि गावातील गोवंश प्रेमी नागरिकांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती दिली.