अभाविपच्या ‘परिषद की पाठशाला’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे

प्रतिनिधी हर्षल चौहान, धरणगांव.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने वाडी, वस्ती, गावात जाऊन ‘परिषद की पाठशाला’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. १ जुलै ते ११ जुलै या दरम्यान विशेष उपक्रमाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.
अभाविप ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. विद्यार्थी परिषद राष्ट्रहिताच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील असते. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्वत्र टाळेबंदी आहे. टाळेबंदीमुळे छोट्या व्यवसायापासून शैक्षणिक संस्थापर्यंत सर्वकाही बंद होते, पण शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणापासून नाते दुरावत आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची भीती आहे. गेल्या दीड वर्षांपासून काही विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही, तरी ते एका वर्गातून दुसऱ्या वर्गात गेले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यत आलेले दिसून येते. परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यावर उपाय म्हणून ‘परिषद की पाठशाला’ उपक्रम राबविला आहे. वस्तीत, वाडीत, गावात जाऊन त्याठिकाणी मंदिरात, सामाजिक सभागृहात, झाडाखाली मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे एकत्रित करून पाठशालेत शिकवण्याच काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केले. गारखेडा ता. धरणगाव व धरणगावातील पाड्यावर जावून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. आतापर्यंत १२० हून अधिक विद्यार्थ्यांना पाठशाळेत शिकवण्याचे काम केले. या अभियानात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहरमंत्री इच्छेश काबरा, कल्पेश पाटील, परेश पाटील, योगेश पाटील, कुंदबाला पाटील, निरंजन पाटील, विवेक धनगर, दीपराज पाटील, दीपक चौधरी, अक्षय वाणी, प्रथमेश कासार, आर्यन सैंदाणे, स्नेह भाटिया, देवेंद्र पवार आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!