अभाविप धरणगाव तर्फे विविध प्रलंबित परीक्षा त्वरित घेण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

धरणगाव

शासनाने स्पर्धा परीक्षांबाबत घेतलेल्या चूकीच्या धोरणामुळेच स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी गेला. त्यामुळे शासनाने आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध प्रलंबित परीक्षा तात्काळ घ्याव्यात तसेच राज्यसेवा व इतर परीक्षांमधून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अभाविप धरणगाव तर्फे तहसीलदार साहेबांकडे करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून कोरोनामुळे सरकारी नोकरभरती बंद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी चे प्रमाण वाढत आहे. पात्रता असूनही केवळ भरती झाली नसल्याकारणाने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढत आहे. एमपीएससी उत्तीर्ण करूनही नोकरी मिळत नाही. शेवटी एक तरुण आत्महत्या करतो. हे अतिशय दुर्दैवी आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षापासून एमपीएससीची परीक्षेची तारीख सतत पुढे ढकलावी लागली परंतु आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात, तसेच नोकरभरती सुरू करून बेरोजगारांना न्याय द्यावा. या सर्व मागण्यांची दखल घेऊन अमंलबजावणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शहरमंत्री इच्छेश काबरा यांनी दिला.
यावेळी अभाविप जळगाव जिल्हा सहसंयोजक सारंग पाटील, शहरमंत्री इच्छेश काबरा, गौरव देशमुख, रोहित पाटील, महेश माळी, शिवदास पारधी, नितीन महाजन ,राहुल मनोरे, अमोल पारधी, निखिल बाचपाई आदी विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!