धरणगाव नगरपरिषदेवर पाणी समस्येबाबत महिलांचा आक्रोश.
धरणगाव प्रतिनिधी हर्षल चौहान
नगरपरिषद परीसरात ठिय्या मांडून महिलांनी फोडल्या बांगड्या.
धरणगाव येथील लोहार गल्ली परिसरातील संतप्त महिलांनी सतत उद्भवणाऱ्या पाणी समस्येबाबत माजी नगरसेविका नर्मदाबाई एकनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त झालेल्या महिला भगिनींनी लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या दालनासमोर तब्बल एक तास ठिय्या मांडून होते. जोवर नगराध्यक्ष येत नाही आणि आमच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी महिलांनी घेतली. परंतु धरणगाव नगरपालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार, नगराध्यक्ष निलेश चौधरी,पाणी पुरवठा सभापती व सत्ताधारी अन्य नगरसेवक तसेच प्रभागातील नगरसेवक भालचंद्र जाधव व शोभाताई राजपुत यापैकी कोणीही यावेळी हजर नसल्याने सर्व संतप्त महिलांनी न.पा. च्या आवारात हातातील बांगड्या फोडून आपला निषेध नोंदविला. त्यानंतर पाणी पुरवठा अधिकारी अनुराधा चव्हाण यांच्या दालनात जाऊन जाब विचारला असता त्यांचे कडुन अपेक्षित समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित महिला व नागरिकांचा संताप अधीक तीव्र झाला.त्यानंतर काही वेळाने लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी नगरपरिषदेत येऊन पाणी समस्ये संदर्भात सर्व नागरिक व महिलांचे प्रश्न जाणुन घेतले. व लवकरच आपणास अर्धातास पाणी वाढवून मिळेल अशी माहिती दिली. सकाळी ११ वाजेपासून ते १ वाजेपर्यंत न.पा.येथे मोर्चात शामिल महिला व नागरिक हैराण झाले. यावेळी लोहार गल्ली भागातील संतप्त महिलांनी सांगितले की, धरणगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी व अंजनी नदी भरभरून वाहत असून सुध्दा लोहार गल्ली परिसराला २३ दिवसापासून पाणीपुरवठा झालेला नव्हता व आज रोजी फक्त एक तास पाणी सोडल्यामुळे या महिला भगिनींचा संताप अनावर झाला. सर्व महिला व नागरिकांनी सुमारे २ तास पालिकेत सत्ताधारी तसेच न. पा. प्रशासनाला धारेवर धरले.
या प्रसंगी असंख्य महिला भगिनी तसेच परिसरातील किरण वऱ्हाडे, टोनी महाजन, विकास चौहान, हरीश माळी, दयाराम माळी, गोपाळ लोहार, हर्षल माळी, गोपाल लोहार आदी उपस्थित होते.