घर घर तिरंगा – मन मन तिरंगा च्या माध्यमातून अभाविप करणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे आयोजन;घरोघरी तिरंगा ध्वज व भारत माता पूजन करून अभाविप करणार स्वातंत्र्य दिवस साजरा
धरणगाव प्रतिनिधी- हर्षल चौहान
१५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपले बलिदान दिले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण होऊन या १५ ऑगस्ट पासून आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देशभर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करीत आहे. या अनुषंगाने एक कार्यकर्ता एक कुटुंब एक तिरंगा या अभियानाचे दिनांक १५ ऑगस्ट २०२१ ला आयोजन केले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात एक गाव एक तिरंगा हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने राबविणार आहे. या अभियानासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात योजना करण्यात आलेले आहे. त्याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात देखील तालुक्यांसाठी ही योजना करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यात ४७ ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम व ६५० गावातील ८२५० कुटुंबात भारत माता प्रतिमापूजन व घर-घर तिरंगा, मन-मन तिरंगा हे ब्रीद घेऊन घरांवर राष्ट्रध्वज लावणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जिल्ह्याच्या वतीने दहा हजार प्रतिमांचे घरोघरी वाटप देखील करण्यात येणार आहे. तालुका, शहर, वस्ती, पाडा व कॉलनीतील घरोघरी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी परिषद नागरिकांना सहभागी करून घेणार आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ऑनलाइन स्पर्धांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. यात वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लघुपट स्पर्धा याचा समावेश आहे. तसेच या अमृत महोत्सवानिमित्ताने अनेक तालुक्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यात १४ ऑगस्ट रोजी एक शाम देश के नाम व सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहे. तसेच १ जुलै ते ९ जुलै दरम्यान परिषदेतर्फे परिषद की पाठशाला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी परिषद की पाठशाला घेण्यात आली होती. त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची वेशभूषेत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच काही ठिकाणी माजी सैनिकांचा, कोरोना योद्धांचा, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. काही चौकांमध्ये भारत मातेचे सामूहिक प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. तसेच ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ गावांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहे. एकूण जिल्ह्यात २५ कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करून आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन या सगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान करतो की आपण देखील या अभियानात आपल्या कुटुंबासह नक्की सहभागी व्हावे. यावेळी जिल्हा प्रमुख डॉ. सुनील कुलकर्णी सर, महानगर अध्यक्ष प्रा. भुषण राजपूत सर, जिल्हा सहसंयोजक सारंग पाटील, महानगर मंत्री आदेश पाटील, कार्यक्रम जिल्हा प्रमुख इच्छेश काबरा, महानगर कार्यक्रम प्रमुख आकाश पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश महाजन, चैतन्य बोरसे,चिराग तायडे,प्रज्वल पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.