धरणगाव येथील गोशाळेत सुपूर्द केलेल्या गुरां संदर्भात अखेर सोमवारी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
धरणगाव प्रतिनिधी – हर्षल चौहान.
सणा सुदीच्या पार्श्वभूमीवर तसेच ईद च्या अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे शहरात सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी २० गुरे धरणगाव शहरात कुरेशी मोहल्ला भागात आढळून आली होती. सदर गुरांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गोशाळेकडे सुपूर्द करण्यात आली होती. परंतू थोड्या दिवसांनी यात राजकीय दबाव सुरु झाला. अगदी गोशाळेला याबाबत पोलिसांनी एक पत्र देत ही गुरं मूळ मालकांना परत देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गोवंश प्रेमी श्रीपाद पांडे यांनी याबाबत धरणगाव न्यायालयात अॅड.राहुल पारेख यांच्यामार्फत दि. ३१ जुलै रोजी रात्री उशिरा एक याचिका दाखल केली.
न्या.एस.डी.सावरकर यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रात्रीच सुनावणी घेऊन गुरांची परिस्थिती व जप्तीबाबत वस्तूनिष्ठ अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश धरणगाव पोलिसांना दिले होते.
तक्रार न्यायालयात गेल्याने अखेर पोलिसांनी गुरांचा ताबा सांगणाऱ्या मालकांवर आज २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस नाईक मिलिंद सोनार यांच्या फिर्यादीनुसार दिनांक २० जुलै रोजी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व पथकाने बकरी ईद सणाच्या अनुषंगाने धरणगाव शहरात सर्च ऑपरेशन करीत पेट्रोलिंग करीत असताना १२.३० वाजेच्या सुमारास कुरेशी मोहल्ला धरणगाव येथे सर्च ऑपरेशन करीत असताना १) जमील अहमद खान अहमद रहीम २) शेख शरीफ मुसा ३) शेख रफीक शेख मुसा यांच्यावर विनापरवाना कत्तलीचा उद्देशाने बांधलेले गुरे मिळून आले त्यानुसार त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 च्या सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, कलम 6, कलम ९, कलम ९ अ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहेत.
यात गुन्हा दाखल झाल्याने गोप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.