सावली तालुका विकासात प्रथम क्रमांकावर आणणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन
चंद्रपूर दि. 19 ऑगस्ट : जिल्ह्यातील सावली तालुका हा सिंचनाच्या दृष्टीने परिपूर्ण होत असून रस्ते, पाणी, मुलभूत सुविधा अंतर्गत आदी कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. केवळ जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भात सावली तालुका विकासात प्रथम क्रमांकावर आणण्याचे आपले उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
सावली येथे नगर पंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी प्रशासक महादेव खेडकर, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, राकेश गड्डमवार, संदीप गड्डमवार, दिनेश पाटील चिकटूनवार, प्रकाश देवतळे, ॲङ राम मेश्राम, राजू सिद्दम, तहसीलदार परिक्षित पाटील, नगर पंचायत मुख्याधिकारी मनिषा वजाडे आदी उपस्थित होते.
सावली शहर व तालुक्यात सर्व विकासात्मक कामे करण्याचा आपला मानस आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, नगर पंचायतीची ही इमारत पूर्वी महसूलची होती. तेथे बसण्याचीसुध्दा सुविधा नव्हती. ही परिस्थिती पाहून सदर इमारत नगर विकास विभागाला हस्तांतरीत करून शहराच्या मुख्य मार्गावर लोकार्पण करतांना अतिशय आनंद होत आहे. भविष्यात आठ कोटी रुपये खर्च करून येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात येईल.
पुढे पालकमंत्री म्हणाले, सावली येथील बसस्थानक लवकरच पुर्णत्वास येईल. महात्मा जोतिबा फुले उद्यानासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. रमाई सभागृहाकरीता तीन कोटी रुपये, पाणी पुरवठा योजनेसाठी 12 कोटी रुपये, एक्सप्रेस फिडरकरीता अतिरिक्त दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत नळ देण्यासाठी अडीच कोटी रुपये उपलब्ध करून देऊ. पुढील दोन महिन्यात नवीन पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात येईल. वनविभागाचे विश्रामगृह, सा.बां. विभागाचे निवासस्थान यासाठी 10 कोटी रुपये प्रस्तावित आहे. पैशाचा ओघ शहरासाठी सुरू झाला असून तीन कोटी रुपये खर्चून विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ई – लायब्ररी बांधण्यात येईल. येथील क्रीडा संकूलाकरीता पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. आतापर्यंत सिंचनाकरीता सावली तालुक्याला 600 कोटी रुपये दिले असून आसोलामेंढा धरणाची उंची वाढविण्यासाठी 250 कोटी रुपये प्रस्तावित आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते दिलीप गेडाम, रामदेव देवरा, दादाजी आत्राम आदींना वनहक्क दावे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी मनिषा वजाडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सावली येथे बुध्द विहाराचे लोकार्पण व रमाई सभागृहाचे भुमिपूजन :
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते धम्मसेनापती सारीपुत्त महामोग्गलान सेवा समितीअंतर्गत निर्माण झालेल्या बुध्द विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, गौतम बुध्दाचा विचार हा माणूस घडविण्याचा आहे. जगातील 127 देशात धम्माची उपासना होते. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे या देशाची लोकशाही मजबूत व अबाधित आहे. बाबासाहेबांचा इतिहास हा परिश्रमाचा असून त्यांच्यामुळेच देश स्वतंत्र झाल्यावर शोषित, दलित, आदिवासींना हक्क् मिळाले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या रमाई सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, ए.आर. दुधे, पं.स.सभापती विजय कोरेवार, प्रकाश देवतळे, उल्हास यासनवार, रुपचंद थोरात आदी उपस्थित होते.