टेस्लाच्या एलन मस्क यांना सरकारची चिनी बनावटीच्या इलेक्ट्रिक कार भारतात न विकण्याची सूचना
नवी दिल्ली,
इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) निर्माता टेस्लाला भारतात चिनी बनावटीच्या कार विकू नयेत आणि त्याऐवजी त्यांनी भारतात त्यांचे उत्पादन करण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले आहे. एलन मस्कच्या नेतृत्वाखालील कंपनीला भारतात उत्पादित केलेल्या कार निर्यात करण्याची नितीन गडकरी यांनी विनंती केली. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाची मेड इन चायना गाडीला प्रवेश असणार नाही. या संदर्भात टेस्लाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचनाही दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2021’ ला संबोधित करताना केले आहे. टेस्लाला मी सांगितले आहे की चीनमध्ये बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतामध्ये विकू नका. भारतात इलेक्ट्रिक कार तुम्ही तयार कराव्यात आणि त्यांची निर्यातही केली पाहिजे. तुम्हाला जे काही समर्थन हवे आहे, ते आमच्या सरकारकडून पुरवले जाईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर टाटा मोटर्सने तयार केलेल्या इलेक्ट्रिक कारलाही नितीन गडकरींनी पाठिंबा दिला आहे. टाटा मोटर्सने तयार केलेल्या इलेक्ट्रिक कार टेस्ला वाहनांपेक्षाही कमी नसल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. आपल्या इलेक्ट्रिक कारद्वारे टेस्ला भारताच्या वाहन उद्योगात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी यापूर्वी भारत सरकारकडे आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. एलन मस्क म्हणाले होते की भारतात आयात शुल्क खूप जास्त आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, कर सवलतींशी संबंधित मागणीबाबत ते अजूनही टेस्ला अधिकार्यांशी चर्चा करत आहेत.
भारतात आयात शुल्क कमी करण्याची मागणी टेस्ला करत आहे. यापूर्वी टिवटरवर मस्क यांनी म्हटले होते की भारतात इलेक्ट्रिक कार आणण्याची टेस्लाची योजना देशातील मोठ्या आयात शुल्कांमुळे अडथळा आणत आहे. इलेक्ट्रिक कार आम्हाला भारतात आणायची आहे, पण येथील आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा जास्त असल्याचे मस्क यांनी म्हटले होते.
भारतात 40,000 डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या पूर्णपणे आयात केलेल्या कारवर सध्या ण्घ्इ (किंमत, विमा आणि मालवाहतूक) सह 100 टक्के आयात शुल्क आकारले जाते. त्यापेक्षा कमी किमतीच्या कारवर आयात शुल्क 60 टक्के दराने आकारले जाते. देशात विकल्या जाणार्या बहुतेक कारची किंमत 20,000 डॉलरपेक्षा कमी आहे. यामध्ये भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही किरकोळ आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची कार बाजारपेठ आहे, ज्यात वार्षिक 30 लाख वाहनांची विक्री होते.