छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेलं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषदेत उभारली गुढी; पालकमंत्र्यांनी केले पूजन

बुलडाणा दि. 6 सतत महाराष्ट्रावर कोणते ना कोणतं संकट येत आहे, अतिवृष्टी आहे, वादळ आहे, कोरोना सारखी महामारीतून आपली अर्थव्यवस्था सावरत असताना आज आपण महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.  छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद आवारात पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली व पूजन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ.शिंगणे बोलत होते.

ते पुढे म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील रयतेचे राज्य ज्या पद्धतीने सुरू होतं,  त्याच पद्धतीने राज्यात शासनाचे काम सुरू आहे. कोरोना सारख्या संकटातून बाहेर पडण्याचे काम राज्य सरकार करत आहे. महाराष्ट्र मध्ये उत्तम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचे काम केल्या जात आहे. देशात सर्वात पारदर्शक काम कोरोनाच्या काळात राज्य सरकार करत आहे.

तांब्याचा कळस, भगवी पताका आणि त्यांना आंब्याच्या पानांचे तोरण बांधून ही गुढी उभारण्यात आली होती. तर गुढीच्या पायथ्याशी आकर्षक अशी पुष्प सजावट आणि आकर्षक रांगोळी काढण्यात आली. सुरुवातीला राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, उपाध्यक्ष कमलताई जालींदर बुधवत,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. तसेच बुलडाणा जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयवर सुद्धा गुढी उभारण्यात येऊन हा दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर राखून प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!