माजी आमदार संतोष चौधरींना अटक करा, अन्यथा आंदोलन ! जिल्ह्यातील मुख्याधिकार्‍यांच्या संघटनेने दिला इशारा

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी.
भुसावळ मधील माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकावल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. चौधरी यांना अटक करावी व चिद्रवार यांना पोलीस संरक्षण द्यावे, अन्यथा जिल्ह्यातील मुख्याधिकारी काम बंद आंदोलन करतील असा इशारा मुख्याधिकार्‍यांच्या संघटनेने दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, काल सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी चिद्रवार यांनी टिंबर मार्केटमधील सर्व्हे नंबरमधील २०६ सर्वोदय छात्रालयाच्याजागेवरील सुरु असलेल्या बांधकामाची पाहाणी करण्यासाठी गेले होते. तेथे माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुख्याधिकारी यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चिद्रवार यांनी बाजारपेेठ पोलिस ठाणे गाठत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी चर्चा केली, झालेला प्रकार त्यांना सांगितला.

या अनुषंगाने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष चौधरी यांच्या विरूद्ध बाजारपेठ पोलीस स्थानकात भादंवि कलम ३५३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संतोष चौधरी यांचा तपास सुरू केला असला तरी ते मिळून आलेले नाहीत.

दरम्यान, भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या धमकीचे व्यापक प्रमाणावर पडसाद पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जिल्ह्यातील मुख्याधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यात संतोष चौधरी यांना तातडीने अटक करण्यात यावी आणि मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील मुख्याधिकारी कामबंद आंदोलन करतील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना सहाय्यक आयुक्त नगरविकास शाखा-सतीश दिघे; अतिरिक्त आयुक्त जळगाव महापालिका-विद्या गायकवाड; संदीप चिद्रवार-मुख्याधिकारी भुसावळ; विलास लांडे- मुख्याधिकारी रावेर; सौरभ जोशी- मुख्याधिकारी सावदा; समीर शेख-मुख्याधिकारी मुक्ताईनगर/वरणगाव; किशोर चव्हाण- फैजपूर; साजीद पिंजारी- शेंदुर्णी; शोभा बाविस्कर- पाचोरा; किरण देशमुख- एरंडोल आणि शाम गोसावी-उपायुक्त जळगाव महापालिका यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!