राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पुन्हा जुंपली; आमदार पुतण्यावर काकाचे आरोप
बीड,
बीड नगरपालिकेतील विकास कामावरून क्षीरसागर काका पुतण्यात पुन्हा जुंपली आहे. शिवसेनेच्या ताब्यातील बीड नगरपालिकेतील विकास कामात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर विनाकारण खोडा घालत असल्याच आरोप बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. विकास कामे करू दिले नाही तर आमदार व पालकमंत्र्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर आरोप करण्यात आले.
शिवसेना आणि भाजपचा ताब्यातील बीड गेवराई आणि धारूर नगरपालिकेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात यावीत असा आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काढला आहे. नगरपालिका ही स्वायत्त संस्था असतानादेखील पालकमंत्र्याकडून जाणीवपूर्वक सुडाचे राजकारण केलं जात असल्याचा आरोप खुद्द शिवसेनेकडून केला जात आहे.
महाविकास आघाडी राज्याच्या सत्तेत एकत्रित असले तरी देखील स्थानिक पातळीवरील राजकारणात सेना राष्ट्रवादी आणि काँग-ेसमध्ये खटके उडत असल्याचे बीडमधील प्रकारावरून समोर आले आहे. यासंदर्भात शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री यांच्याकडे तक्रार केल्याचे शिवसेनेचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.
बीड नगर विविध योजनेतून निधी मंजूर करून घेतला मात्र सुडाचे राजकारण करणार्या स्थानिक आमदारांनी पालकमंत्री यांच्याकडून नगरपालिकेच्या संविधानिक हक्क हिसकावून घेत बीड शहरात होणारी विविध विकास कामे अडवली आहेत. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत बीडकरांनी मोठ्या विश्वासाने विरोधकांना निवडून दिले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेची कामे सात कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, मात्र कारण नसताना पालकमंत्र्यांना हाताशी धरून आमदारांनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहे. यामुळे दलित वस्ती विकासापासून दूर राहिले आहेत सातत्याने पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे स्थानिक आमदार मागासवर्गीयावर केला जात आहे. हा अन्याय थांबवला नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक विकास जोगदंड यांनी दिला आहे.
बीड शहरात आमदाराच्या आशीर्वादाने दोन नंबरचे अवैद्य धंदे सुरू असून त्यामुळे बीडचे संस्कृती खराब होत आहे. तसेच ग-ामीण भागातील रस्ते त्यांची दुरावस्था याकडे लक्ष न देता विकास कामात खोडा घालण्याचे काम करत आहेत. तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समितीमध्ये टक्केवारीचे प्रकार सुरू आहेत. याबरोबरच ब्लॅक मार्केटिंग, धान्य, वाळू यामध्ये आमदारांचे लोक आहेत मटके,पत्ते, हे सगळे आमदारांचे आहेत आणि यांची टक्केवारी आमदाराकडे जाते असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक योगेश क्षिरसागर यांनी केला आहे. यावेळी योगेश क्षिरसागर यांनी आमदाराच्या दुर्लक्षामुळे खराब झालेल्या रस्त्यांचा व्हिडीओ दाखवत पोल खोल केली.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना फोनवरून त्यांच्यावर झालेल्या आरोपावर विचारणा केली असता नगराध्यक्षा सारख्या छोट्या लोकांच्या आरोपावर मला बोलायला वेळ नाही असे उत्तर दिले. तसेच बाईट देण्यास नकार दिला. यामुळे बीड मधील काका-पुतण्या वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर बीडमधील सुडाचे राजकारण पेटल्याचे चित्र दिसून येत आहे.