उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणाच्या वाळूज 33 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण
या उपकेंद्रामुळे नवीन ग्राहकांना तातडीने वीज पुरवठा करणे शक्य
औरंगाबाद, दिनांक 11- महावितरणाच्या वाळूज एमआयडीसी येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचे आज उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे हस्ते लोकार्पण आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कोरोना काळात नागरिकांना अखंडपणे विजेचा पुरवठा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतूक करित या काळात कर्तव्य बजावतांना जीव गमावलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना योध्दा संबोधून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी प्रभारी प्रादेशिक संचालक तथा मुख्य अभियंता भुजंग खंदारे,अधिक्षक अभियंता मोहन काळोगे (स्थापत्य), संजय सरग, बिभीषण निर्मळ यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ.राऊत म्हणाले, कोरोना काळात महावितरण यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता सातत्याने गुणवत्तापूर्वक काम करीत चोवीस तास अखंडपणे वीज पुरवठा केला आहे. तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवर ग्राहकांच्या समस्या, अडचणी जाणून त्या तत्काळ सोडविण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे ग्राहकांना न्याय देण्याच्या कामाचे महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालक श्री. खंदारे यांचे कौतुक केले.
श्री. डॉ. राऊत म्हणाले वाळुज औद्योगिक नगरी मध्ये 400 केव्ही चे एक 132 केव्ही चे एक तसेच 33 केव्हीचे 4 उपकेंद्र कार्यान्वित आहे. या सर्व अति उच्चदाब उपकेंद्रातून व जालना जास्तीत जास्त परिसराला वीज पुरवठा होत असतो. वाळूज औद्योगिक नगरीतील एल सेक्टर येथील 33 के व्ही उपकेंद्राची स्थापित क्षमता 30 एमव्हीए एवढी असुन त्यावरील एकूण भार 27 एमव्हीए एवढा पोहचला होता. महावितरण ही सार्वजनिक कंपनी असल्यामुळे ग्राहकांच्या मागणी एवढा दर्जेदार वीजपुरवठा करणे आपले कर्तव्य समजून के सेक्टर मध्ये महावितरण कंपनीचे 33/11 के व्ही चे नवीन उपकेंद्र स्थापित केले. या उपकेंद्रामुळे नवीन ग्राहकांना तातडीने वीज पुरवठा करणे तसेच अखंडीत व दर्जेदार वीजपुरवठा करणे महावितरणाला शक्य होईल. यामुळे उद्योजकांना आपल्या उत्पन्नाचा दर्जा उंचावण्यास निश्चित मदत होणार आहे. या नवीन उपकेंद्रांमुळे परिसरातील 22 उच्चदाब व 74 लघुदाब अशा एकूण 96 ग्राहकांना वीजपुरवठा होऊन त्यांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे.महावितरणाने एमआयडीसी औरंगाबाद व वाळूज एमआयडीसी येथे सुसुत्रता ठेवत उद्योगांना सहकार्याचे धोरण राबविले असल्याचेही श्री.डॉ. राऊत यांनी सांगितले. यावेळी डॉ.राऊत यांनी उपकेंद्र परिसरात वृक्षारोपणही केले.