वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची – महासंचालक दिलीप पांढरपट्टे

औरंगाबाद, दिनांक ४ – अवतीभवतीच्या घटनांचे वृत्तांकन संतुलीत आणि तटस्थपणे करण्याची खबरदारी पत्रकारांनी बाळगणे आवश्यक आहे. अशा वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी व्यासंगपूर्ण सतर्कता गरजेची असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

महात्मा गांधी मिशनच्या वृत्त व जनसंवाद महाविद्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात श्री. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, औरंगाबाद विभागाचे संचालक हेमराज बागुल, ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर, जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, प्रा. डॉ. आशा देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

पत्रकारितेकडे व्रत आणि व्यवसाय या दोन स्वतंत्र दृष्टीकोनातून बघताना स्वातंत्र्य लढ्यात अनेक राजकीय नेत्यांनी, समाज सुधारकांनी तत्कालीन नियतकालिके, साप्ताहिके यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची, स्वातंत्र्य लढ्याची महत्त्वाची कामगिरी बजावलेली बघायला मिळते. त्या पत्रकारितेत काळाच्या ओघात झालेले लक्षणीय बदल सांगून श्री. पांढरपट्टे यांनी राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या बाबी एकमेकांशी निगडीत असून पूर्वीच्या काळात प्रसार माध्यमांची आज इतकी संख्या नव्हती. रेडिओ, दूरदर्शन, अन्य माध्यमेही त्यावेळी नव्हती. अशा काळात नियतकालिक, साप्ताहिक चालवणे, व्रत म्हणून पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक होते. अशा काळातही दर्जेदार वृत्तपत्र, नियतकालिके काढल्या गेली. त्या परंपरेतून आजच्या युवा पिढीने बोध घेत संतुलित, वस्तूनिष्ठपणे वृत्तांकन करण्याची खबरदारी आवर्जून घेतली पाहिजे. कारण आज माध्यमांच्या ‘सर्वात आधी’ या चढाओढीत अनेकदा वस्तूस्थितीची पडताळणी न करता वृत्तांकन केल्या जाते. अशा प्रकारच्या घडलेल्या घटनांची शहानिशा न करता वृत्तांकन करणे हे संबंधिताच्या तसेच समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे, याचे गांभिर्य लक्षात घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी पत्रकाराने बाळगणे आवश्यक असल्याचे श्री. पांढरपट्टे यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे वैयक्तिक मत, पूर्वग्रह यापासून अलिप्त राहुन तटस्थपणे संतुलित पत्रकारिता करता येणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी पत्रकाराने बहुश्रुत आणि व्यासंगी असले पाहिजे. त्यादृष्टीने विविध विषयांची माहिती, सातत्यपूर्ण वाचन, चिंतन, सभोवतालचे अद्ययावत ज्ञान ठेवणे या सवयी जाणीवपुर्वक जोपासल्या गेल्या पाहिजेत. यातून घटना घडामोडींकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टीकोन तयार होतो.
निर्भिडता हा पत्रकारीतेचा स्थायी भाव असून कोरोना काळातही पत्रकारांनी निर्भिडतेने घराबाहेर पडून काम केल्याचे बघायला मिळालेले आहे. या क्षेत्राची बलस्थाने लक्षात घेऊन पत्रकारीतेच्या विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेने आपला अभ्यास वाढवण्याचे सांगून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यपद्धतीबाबत श्री. पांढरपट्टे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!