पालकमंत्र्यांकडून तिवसा नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा
कामे सुरळीत नसल्याने पालकमंत्र्यांकडून तीव्र नाराजी, बेजबाबदारपणाबद्दल खडसावले; नागरिकांच्या जीवाशी खेळू नका – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. ३१ : तिवसा शहरात सफाईकामांत नियमितता नाही. डेंग्यूचे रूग्ण वाढत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. स्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. बेजबाबदारपणे वागल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज नगरपंचायत प्रशासनाला दिला.
तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी तिथे भेट देऊन पाहणी केली व नगरपंचायतीच्या कामांचा स्वतंत्र बैठकीद्वारे आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार वैभव फरतारे, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, नरेंद्र विघ्ने आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पावसाळ्याच्या काळात डेंग्यू, मलेरिया आदी साथरोग प्रतिबंधासाठी नालेसफाई, औषध फवारणी, सर्व ठिकाणी नियमित स्वच्छता आवश्यक आहे. मात्र, शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अशा तक्रारींची दखल घेऊन वेळीच सुधारणा होणे आवश्यक आहे. सार्वजनिक स्वच्छता, नागरिकांच्या आरोग्याची जपणूक हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ज्या ज्या सुविधा पाहिजेत, त्यासाठी निधीची कधीही कमतरता पडू दिलेली नाही. याबाबत वेळोवेळी सूचना, निर्देश देऊनही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा बेजबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.
पाणीपुरवठ्याबाबतही मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. पाणी गढूळ असल्याच्या तक्रारी आहेत. पुरवठ्याच्या कामात तत्काळ सुधारणा करावी. शहरातील सफाईकामे तत्काळ सुरळीत करावी. सर्व ठिकाणी स्प्रेईंग, फॉगिंगमध्ये सातत्य ठेवावे. कुठल्याही कामात हयगय चालणार नाही. या परिस्थितीत तत्काळ सुधारणा दिसली पाहिजे. आपण स्वत: पुन्हा येऊन याबाबत आढावा घेऊ, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.