पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; हानीग्रस्त कुटुंबांचे सांत्वन

नुकसानग्रस्तांना शक्य ती सर्व मदत मिळवून देऊ – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. २२ : अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. आपदग्रस्तांना शक्य ती सर्व मदत मिळवून देऊ, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू आदी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली व ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी खारतळेगाव येथील अतिवृष्टीने आलेल्या पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या कुटुंबांना भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना तत्काळ मदत, सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार नीता लबडे, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.

शासन आपद्ग्रस्तांच्या खंबीरपणे पाठीशी

खारतळेगाव येथील अतिवृष्टीने आलेल्या पुरात प्रवीण गुडधे, निरंजन गुडधे हे युवक वाहून गेले. या दोहोंच्या कुटुंबियांची भेट घेऊन पालकमंत्र्यांनी त्यांची व्यथा जाणून घेतली व सांत्वन केले. घरातील व्यक्ती जाण्याचे दु:ख मोठे आहे. आपण स्वत: एक कुटुंबिय म्हणून या कुटुंबांच्या कायम पाठीशी राहू. या कुटुंबांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी दिलासा दिला. यावेळी पालकमंत्र्यांकडूनही 10 हजार रूपयांची तातडीची मदत करण्यात आली.

भरपाईसाठी सविस्तर प्रस्ताव पाठवा

अतिवृष्टीने रामा येथे भिंतीची पडझड, तसेच धान्य, कडबा भिजून नुकसान आदी हानी झाली आहे. साऊर येथेही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. या सर्व गावांतील घरांच्या पडझडीबाबत पंचनामे करण्यात आले. त्याचप्रमाणे, शेतीनुकसानीचेही परिपू्र्ण व सविस्तर पंचनामे करावेत. प्रत्येक बाबीची नोंद घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

रेणुका नाल्याचे खोलीकरण आवश्यक

टाकरखेडा संभू येथील रेणुका नाला व इतर परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतभवन येथे पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील समस्या जाणून घेतल्या. काही वर्षांपूर्वी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने नाला खोलीकरणाचे काम झाले होते. त्यामुळे पूरहानीचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे पुन्हा नाला खोलीकरण करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रेणुका नाल्याचे खोलीकरणाचे काम निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

पूरसंरक्षणासाठी उपाययोजना

पूरसंरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक भिंत, नाला खोलीकरण, शेतात जाण्याची अडचण होऊ नये म्हणून चांगले पांदणरस्ते आदी विविध कामे हाती घेण्यात येतील. अशा कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रशासनाने शेतकरी बांधवांशी संवाद साधून प्रत्येक नुकसानीची अचूक दखल घ्यावी. एकही पात्र व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!